मुदत संपलेले पदार्थ पुन्हा ग्राहकांना दिले ? ब्लिंकिटला एफडीएचा मोठा दणका

FDA -रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट्स, रिलायन्स रिटेल, झोमॅटो हायपरप्युअर. ब्लिंकिट कॉमर्सच्या कंपन्यावर एफडीएची कारवाई

Blinkit

Blinkit

FDA Action on Blink Commerce Private Limited : अन्न व औषध प्रशासनाची (FDA) राज्यभर धडक कारवाई सुरू आहे. भिवंडीतील ब्लिंक (Blinkit) कॉमर्स विरुद्ध अन्न व औषध प्रशासनाची कठोर कारवाई करत अन्न व्यवसाय परवाना निलंबित करण्यात आला आहे. तसेच रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट्स, रिलायन्स रिटेल, झोमॅटो हायपरप्युअर. ब्लिंकिट कॉमर्सच्या निघोजे येथील आस्थापनांचे अन्न व्यवसाय परवाने निलंबित करम्यात आले आहे.

ब्लिंक कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेडचा पागाव, भिवंडी या आस्थापनेचा अन्न व्यवसाय परवाना चार दिवसांपूर्वीच निलंबित करण्यात आला आहे. येथील छाप्यात 32 लाख 71 हजार किंमतीचा मुदत संपलेले, खराब व विक्री अयोग्य असलेल्या अन्नपदार्थांचे विल्हेवाट लावण्यात आलेली नाही. त्यामुळे भिवंडी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. विशेष तपासणी व अंमलबजावणी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत 21 ऑक्टोबरला भिवंडी तालुक्यातील पागाव येथील मे. ब्लिंक कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड तपासणी करण्यात आली. यात सुमारे 18,405 कालबाह्य, खराब अथवा विक्रीस अयोग्य अन्नपदार्थांच्या नोंदी आढळून आल्या. संबंधित साठ्याची नोंदविलेली किंमत 32 लाख 71 हजार इतकी आहे.

तपासणीतील गंभीर बाबी
तपासणीदरम्यान संबंधित अन्नसाठ्याची वाहतूक, प्राप्ती व अंतिम विल्हेवाट यासंबंधी संपूर्ण अभिलेख उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले.
विशेषतः वजन पावत्या, वाहन व वाहतूक तपशील, ई-वे बिल, माल प्राप्तीच्या पावत्या, सीसीटीव्ही नोंदी, वेळ-मुद्रांकित छायाचित्रे तसेच अंतिम विल्हेवाट प्रमाणपत्रे यांची सलग व स्वतंत्ररीत्या पडताळता येण्याजोगी पुरावा-साखळी उपलब्ध नव्हते. सुनावणीदरम्यान संबंधित कंपनीचे संचालक विजय राजपुरोहित उपस्थित होते. दोन संस्थांशी केलेल्या करारांच्या प्रती सादर केल्याचे सांगण्यात आले. तथापि, केवळ करारांच्या आधारे संबंधित अन्नसाठा प्रत्यक्ष उचलण्यात आला आणि वाहून नेण्यात आला व अधिकृत पद्धतीने नष्ट करण्यात आला, हे सिद्ध होत नाही. तसेच आणखी चार विक्रेत्यांची नावे नमूद करण्यात आली; मात्र त्यांच्याशी संबंधित संपूर्ण करार व पूरक अभिलेख उपलब्ध करून देण्यात आले नाहीत.

अन्न व्यवसाय परवाना निलंबित
तपासणीतील निष्कर्ष, उपलब्ध अभिलेख, सुनावणीदरम्यान सादर करण्यात आलेले म्हणणे तसेच निर्देशांचे अपूर्ण पालन विचारात घेऊन सक्षम परवाना प्राधिकाऱ्याने 22 ऑक्टोबर रोजी आस्थापनेचा अन्न व्यवसाय परवाना निलंबित करण्यात आला आहे. निलंबनाच्या कालावधीत संबंधित परवान्याअंतर्गत अन्न व्यवसायाचे कामकाज करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच संबंधित अन्नसाठ्याची विक्री, वाहतूक, हस्तांतरण, पुनपैंकिंग, लेबल बदलणे किंवा सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्वलिखित निर्देशाशिवाय विल्हेवाट लावण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


सात पथकांमार्फत व्यापक तपासणी मोहीम

यापूर्वी 14 व 15 ऑक्टोबरला अन्न व औषध प्रशासनाच्या ठाणे व पुणे येथील सात पथकांमार्फत भिवंडी, अंबरनाथ, चाकण व निघोजे परिसरातील गोदामे, विल्हेवाट केंद्रे व संबंधित आस्थापनांची विशेष तपासणी करण्यात आली. या मोहिमेमध्ये 48 लाख रुपये किंमतीचा कालबाह्य अथवा खराब अन्नसाठा आढळून आला. या आस्थापनांकडून अन्नसाठ्याच्या अंतिम विल्हेवाटीबाबत संपूर्ण व स्वतंत्ररीत्या पडताळता येण्याजोगी पुरावा-साखळी उपलब्ध झाली नसल्याचे निदर्शनास आले. मूळ तपासणी अहवालानुसार रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट्स, रिलायन्स रिटेल, झोमॅटो हायपरप्युअर आणि ब्लिंकिट कॉमर्सच्या निघोजे येथील संबंधित आस्थापनांचे अन्न व्यवसाय परवाने निलंबित करण्यात आले आहेत.


संभाव्य अनधिकृत पुरवठा साखळीचा तपास

प्राथमिक तपासादरम्यान कालबाह्य, खराब अथवा विक्रीस अयोग्य अन्नपदार्थ अधिकृत विल्हेवाटीसाठी दिल्यानंतर त्यांची प्रत्यक्ष विल्हेवाट झाली किंवा नाही, तसेच असा साठा मध्यस्थांमार्फत पुन्हा बाजारपेठेत पोहोचविण्यात आला का, या बाबींची पडताळणी करण्यात येत आहे.
भिवंडीतील काही आस्थापनांमध्ये कालबाह्य अन्नपदार्थांच्या विक्रीसंबंधी माहिती प्राप्त झाली असून, संबंधित पुरवठादार व मध्यस्थांच्या भूमिकेचा तपास करण्यात येत आहे. या संभाव्य पुरवठा-साखळीतील संबंधित व्यक्ती व संस्थांची भूमिका आणि परस्परसंबंध पुढील तपास व पुराव्यांच्या पडताळणीच्या अधीन आहेत.

अन्न व्यवसाय चालकांना कठोर इशारा
कालबाह्य, खराब, ग्राहकांकडून परत आलेले किंवा विक्रीस अयोग्य ठरलेले अन्नपदार्थ पुन्हा विक्रीसाठी उपलब्ध होणार नाहीत, याची दक्षता घेणे ही संबंधित अन्न व्यवसाय चालकाची महत्त्वाची जबाबदारी आहे. अशा साठ्याची विल्हेवाट करताना स्वतंत्र वर्गीकरण, प्रमाणन, अधिकृत विल्हेवाट संस्थेची पडताळणी, वाहतूक व प्राप्ती नोंदी तसेच अंतिम विल्हेवाटीचे पुरावे जतन करणे आवश्यक आहे.
अन्न व्यवसाय चालकांनी अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ आणि त्याअंतर्गत लागू नियम व विनियमांचे काटेकोर पालन करावे.
नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या कोणत्याही अन्न व्यवसाय चालकाविरुद्ध उपलब्ध पुरावे व कायद्यातील तरतुदींनुसार कठोर कारवाई करण्यात येईल. अन्नसुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीमध्ये कोणतीही हयगय केली जाणार नाही.

Exit mobile version