मुंबई : मुंबईत कोरोना व्हायरस आटोक्यात आल्यानंतर आता झिका व्हायरसने (Zika virus) धोक्याची घंटा वाजवली आहे. मुंबईतील चेंबूर भागात एका वृद्ध व्यक्तीला झिका विषाणूची लागण झाल्याचे वैद्यकीय अहवालातून समोर आले आहे. या रुग्णाची प्रकृती सध्या स्थिर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्ण आढळलेल्या चेंबूर परिसरातील लोकांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत झिका आजाराने ग्रस्त 79 वर्षीय रुग्ण आढळून आला. या रुग्णाला झिका आजारावर उपचार करून घरी पाठवण्यात आले. या रुग्णाला १९ जुलै २०२३ पासून मधुमेह, उच्च रक्तदाब, खोकला, हृदयविकार, थॅलेसेमियाची लक्षणे होती. मुंबईत झिका विषाणूचा हा पहिला रुग्ण आहे.
झिका व्हायरससारख्या संसर्गजन्य आजारांच्या प्रतिबंधासाठी उपाययोजनांनसाठी नियमित सर्वेक्षण करण्याचे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त व प्रशासक इक्बालसिंग चहल आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिले. त्यानुसार झिका व्हायरसची लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींचाही शोध घेतला जात आहे.
यासोबतच आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिल्या. नागरिकांनी घाबरून जाऊ नये आणि डासांपासून प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. वापरात नसलेले कंटेनर, जंक मटेरियल, टायर आदींची विल्हेवाट लावा, असं आवाहन त्यांनी केलं. या आजाराची चाचणी करण्याची सुविधा मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयात उपलब्ध आहे.
Chandrayaan-3 ; दक्षिण ध्रुवावर लँडिंग, विक्रम आणि प्रज्ञान देणार सूर्यमालेची माहिती
लक्षणे
झिका हा एडिस इजिप्ती या डासामुळं होणारा आजार आहे. हा व्हायरस एडिस डासाच्या चाव्याव्दारे मानवी शरीरात प्रवेश करतो. या आजाराच्या 80 टक्के रुग्णामध्ये कोणतेही लक्षणं दिसून येत नाहीत. तर इतर संक्रमित लोकांमध्ये ताप, सांधेदुखी, स्नायू दुखणे, डोकेदुखी, डोळे लाल होणे, उलट्या होणे, शरीरावर लाल पुरळ येणे अशी लक्षणे दिसतात.
उपचार
झिकासाठी कोणतीही लस किंवा उपचार नाही. झिका विषाणू संसर्गजन्य नाही. झिका विषाणू चावलेल्या डासाने दुसऱ्या व्यक्तीला चावल्यास झिकाची लागण होते. जे लोक फिरायला बाहेर गेले आहेत त्यांना घरी परतल्यानंतर दोन दिवस ताप असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.