Download App

“माझ्या आयुष्यातील 4 वर्ष ‘फुकट’ गेली” : आणखी एका बड्या नेत्याने सोडली ठाकरेंची साथ

मुंबई : शिवसेना (UBT) ची बाजू जोरदारपणे मांडणाऱ्या आमदार मनिषा कायंदे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. वर्धापनदिन अगदी तोंडावर येऊन ठेपला असतानाच ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जात आहे. अशात ठाकरेंना आणखी एक धक्का बसला आहे. माझ्या आयुष्यातील 4 वर्ष फुकट गेली, असं म्हणतं माजी आमदार आणि शिवसेना (UBT) चे उपनेते शिशिर शिंदे यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र केला आहे. याबाबतच एक पत्र लिहुन त्यांनी भूमिका स्पष्ट केली. (Former MLA and deputy leader of Shiv Sena (UBT) Shishir Shinde left the party)

काय म्हणाले शिशिर शिंदे?

सन्माननीय श्री. उध्दवजी ठाकरे,

पक्षप्रमुख,

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे),

मातोश्री, वांद्रे (पूर्व)

सप्रेम जय महाराष्ट्र!

दि. १९ जून २०१८ रोजी मी अतिशय आत्मीयतेने शिवसेनेत पक्षप्रवेश केला. त्यानंतर ४ वर्षात ३० जून २०२२ पर्यंत मला कोणतीही जबाबदारी मिळाली नाही. प्रत्येक कार्यकर्त्यांची काही ओळख असते. कार्यकर्त्याचे काही गुण असतात. परंतु या चार वर्षाच्या कालावधीत माझे कर्तृत्व, संघटन कौशल्य, हातात घेतलेले काम फत्ते करण्याची जबरदस्त जिद्द, समाजाच्या विविध क्षेत्रात असलेले जिव्हाळ्याचे संबंध या सर्व बाबी दुर्लक्षित करण्यात आल्या याची मला खंत वाटते. माझ्या जीवनातली चार अमूल्य वर्षे “फुकट गेली अशी माझी धारणा आहे.

३० जून २०२२ रोजी माझी “शिवसेना उपनेते” म्हणून नियुक्ती अचानकपणे झाली. जबाबदारी नसलेले शोभेचे पद मिळाले. असो.

मी आजपासून शिवसेनेच्या उपनेतेपदाचा व पक्षाचा राजीनामा देत आहे. माझ्या कोणत्याही कृत्यामुळे शिवसेनेची बदनामी किंवा अप्रतिष्ठा झाली नाही हे मात्र मी निश्चयपूर्वक अभिमानाने नमूद करतो. गेल्या सहा महिन्यांत आपली भेट होणे देखील अशक्य झाले. आपण कोणाला नकोसे होणे माझ्या संवेदनशील मनाला मुळीच रुचत नाही. माझी घुसमट मीच थांबवतो. या पत्राद्वारे कोणतेही जाहीर दोषारोप न करता मी आपणास ‘जय महाराष्ट्र’ करतो.

धन्यवाद. जय हिंद !

जय महाराष्ट्र !

आपला नम्र,

शिशिर शिंदे

Shishir Shinde

कोण आहेत शिशिर शिंदे?

शिशिर शिंदे हे मुळचे शिवसैनिक. पण राज ठाकरेंचे यांचे निकटवर्तीय अशी त्यांची ओळख होती. पुढे राज ठाकरे यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर शिशिर शिंदे यांनी राज ठाकरे यांची साथ दिली. 2009 ला भांडुप विधानमतदार संघातून मनसेच्या तिकिटावर ते आमदार म्हणूनही निवडून आले. 2014 साली झालेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

पुढे 19 जून 2018 ला शिशिर शिंदे यांची शिवसेनेत घरवापसी झाली.  मात्र याच घरवापसीनंतर तब्बल 4 वर्षे पक्षात राजकीय पुनर्वसनासाठी वाट पाहावी लागली, कोणतेही पद, जबाबदारी मिळाली नाही, असा आरोप शिंदे यांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिशिर शिंदे यांची पक्षाच्या उपनेते पदी वर्णी लागली होती. मात्र यात कोणतीही जबाबदारी नव्हती असा दावा त्यांनी केला आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज