Download App

मिलिंद देवरांना शिवसेनेकडून राज्यसभेची उमेदवारी : शिंदेंना दिल्लीत मिळणार ‘हुशार’ चेहरा

मुंबई : महिन्याभरापूर्वीच काँग्रेसमधून (Congress) शिवसेनेत (Shivsena) दाखल झालेले माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा (Milind Deora) यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असतानाच शिवसेनेने त्यांच्या कोट्यातील एका जागेसाठी देवरा यांच्या नावाची घोषणा केली आहे. (Former Union Minister Milind Deora has been announced as a Rajya Sabha candidate by Shiv Sena)

केंद्रीय निवडणूक आयोगाने 15 राज्यांमधील राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणुकीची घोषणा केली आहे. या निवडणुकीसाठी 15 फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. यात महाराष्ट्रातील सहा जागांसाठी निवडणूक घोषित झाली आहे. यातील भाजपच्या वाट्याला तीन, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला एक, शिवसेनेला एक आणि महाविकास आघाडीच्या वाट्याला एक जागा जाणार आहे.

नियमानुसार एक जागा निवडून येण्यासाठी 41 मतांची गरज आहे. सध्या भाजपचे 104 आमदार आहेत.  सध्याच्या संख्याबळानुसार भाजपच्या स्वतःच्या मतांवर दोन जागा सहज निवडून येऊ शकतात. त्यानंतर त्यांच्याकडे 22 मते शिल्लक राहतात. तर सरकारला 22 छोट्या पक्षांच्या आणि अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे. या मतांच्या मदतीने तिसरी जागाही निवडून येऊ शकते. याशिवाय काँग्रेसचीही एक जागा सहज निवडून येऊ शकते.

दुसऱ्या बाजूला सध्याच्या बदललेल्या राजकीय परिस्थितीनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाची जागा शिंदेंच्या शिवसेनेला आणि राष्ट्रवादी (शरद पवार) गटाची जागा अजित पवार यांच्या गटाला मिळण्याचे चित्र आहे. शिंदेंचे सध्या 39 तर अजितदादांचे 41 आमदार आहेत. त्यामुळे या दोन्ही जागांवर दोघांचेही उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. यातीलच एका जागेवर एकनाथ शिंदे यांनी मिलिंद देवरा यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

शिंदेंना दिल्लीत मिळणार तगडा चेहरा :

शिवसेनेचा सध्या दिल्लीत एकही मोठा चेहरा नाही. दिल्लीच्या राजकीय वर्तुळात संपर्क असलेला, उठबस असलेला एक चेहरा शिंदेंना आवश्यक होता. ठाकरे यांच्याकडे प्रियांका चतुर्वेदी यांच्या रुपाने उत्तर भारतीय चेहरा आहे. आता शिंदेंसाठी हे काम देवरा करणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे देवरा यांच्या रुपाने शिवसेनेलाही दिल्लीच्या वर्तुळात एक तगडा चेहरा मिळू शकतो. हीच सर्व समीकरणे डोळ्यासमोर ठेवून देवरा यांच्या पक्षप्रवेशासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेतला असल्याचे सांगितले जात होते.

follow us