Download App

Sharad Pawar: मी काही मागत नाही, तेवढं बेळगाव देऊन टाका

चिंचवड: ‘मी काही मागत नाही. तो बेळगाव (Belgaum) देऊन टाका आणि प्रश्न संपवून टाका, असे मिश्किल विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी चिंचवड येथील एका कार्यक्रमात केलं.

महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद गेल्या अनेक वर्षापासून सुरु आहे. बेळगाव, कारवार, निपाणी आदी मराठी भाषिक भाग महाराष्ट्राला जोडला जावा यासाठी राज्य सरकारचा कोर्टात लढा सुरू आहे. या मुद्द्यावरुन दोन्ही राज्यातील नेते आमनेसामने ठाकले होते.

पिंपरीत शरद पवार यांच्या हस्ते एका खासगी रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले. प्रभाकर कोरे हे या रुग्णालयाचे संस्थापक आहेत. ते कर्नाटकात राहतात. ते शरद पवार यांचे घनिष्ट मित्रही आहेत.

शरद पवार यांनी कोरे यांच्या संस्थेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या अनेक प्रकल्पांचे उद्घाटन केलेले आहे. कालही त्यांनी कोरे यांच्या या नव्या खासगी रुग्णालयाचं उद्घाटन केलं. त्यावेळी शरद पवार यांनी हे मिश्किल विधान केलं.

कोरे यांनी काही नवीन काढलं मला उद्घाटनला जावं लागतं. मग ते कर्नाटकात असो की महाराष्ट्रात असो. ही अनेक वर्षाची परंपरा आहे. नेहमीच त्यांना सांगतो, तुमची इतकी उद्घाटनं मी केली. मी काही मागत नाही. तो बेळगाव देऊन टाका आणि प्रश्न संपवून टाका, असं मिश्किल विधान शरद पवार यांनी केलं. तेव्हा सभागृहात एकच खसखस पिकली.

ते नेहमी सांगतात अख्खा कर्नाटक तुम्ही घ्या. पण बेळगावची मागणी करू नका. यातील चेष्टेचा भाग सोडून द्या. आज बेळगावच्या भागातील जनतेच्या हिताची जपणूक कोरे यांची संस्था करत आहे.

वैद्यकीय क्षेत्रात ज्या काम करणाऱ्या उत्तम संस्था आहेत त्यात कोरे यांची संस्था आहे. ही संस्था बेळगावमध्ये चांगलं काम करत आहे. त्याचा परिणाम म्हणजे बेळगावमधील सर्व घटकांचा यांच्या संस्थेवर विश्वास आहे, असं शरद पवार म्हणाले.

महाराष्ट्रात अशा संस्था आहेत. मी देखील रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आहे जिथे चार लाख विद्यार्थी शिकतात. राज्यात रयतचे काम जसे आहे नेमक्या त्याच पद्धतीचे काम केएलईचे कर्नाटकमध्ये आहे. मला आनंद आहे की त्यांनी त्यांची कार्यक्षमता कर्नाटकमधून महाराष्ट्रातही वाढवली, असं पवार म्हणाले.

Tags

follow us