मुंबई : नोकरीसाठी ‘मराठी माणसांनी अर्जच करु नये’ अशा आशयाची जाहिरात देणाऱ्या ‘एचआर’ जान्हवी सारना हिने माफीनामा सादर केला आहे. समाजमाध्यमांवर या कंपनीबद्दल आणि एचआरबद्दल अनेक संतप्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर कंपनीला आपल्या घोडचुकीची जाणीव झाली आहे. दरम्यान, या जाहिरातीची दखल शिंदे सरकारने देखील घेतली असून मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी कंपनीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. (‘HR’ Janhvi Sarna, who advertised ‘Marathi men should not apply’, submitted an apology)
जान्हवी सारना या एचआरने काही दिवसांपूर्वी लिंकडिनवरती ग्राफिक डिझायनर (Graphic Designer) पदासाठी एक जाहिरात दिली होती. या पोस्टमध्ये पदाला पात्र ठरण्यासाठी आवश्यक सर्व माहिती दिली होती. कामाचे ठिकाण मुंबई (गिरगाव), निवड झालेल्या उमेदवाराला प्रतिवर्ष 4.8 लाखांचा पॅकेज या गोष्टींचा उल्लेख करण्यात आला होता. पण याच बरोबर तिने नोकरीसाठी मराठी माणसांनी अर्जच करु नये, असे स्पष्टपणे म्हंटले होते.
त्यानंतर सोशल मिडीयावर ही पोस्ट वेगाने व्हायरल झाली. जान्हवी सारना आणि संबंधित कंपनीबद्दल संतप्त प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या. दिग्दर्शक अक्षय इंडिकर यांनी देखील ही पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला. मुंबईत मराठी माणूस चालणार नाही हे जाहीर लिहणारी माणसं? जे राजकीय पक्ष मराठी माणसांना मत मागतात त्यांनीही याची जबरी दखल घ्यावी ही अपेक्षा… तरीही नागरिक म्हणून आपण खपवून घेत आहोत? एवढा तिरस्कार? शेयर करा आणि योग्य ती दखल घ्यायला भाग पाडा, असे आवाहनही त्यांनी केले होते.
त्यानंतर आता सारना यांनी दुसरी पोस्ट करुन माफीनामा सादर केला आहे. मी मनापासून माफी मागते, काही दिवसांपूर्वी मी ग्राफिक डिझायनरची नोकरीसाठी पोस्ट शेअर केली होती. पण त्यातील एका आक्षेपार्ह वाक्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. मात्र मी तुम्हाला सांगू इच्छिते की मी अशा प्रकारच्या भेदभावाला प्रोत्साहन देल नाही. मी चुकून या पोस्टमध्ये अशाप्रकारचा उल्लेख केला होता. दरम्यान, सारना यांच्या माफीनाम्यानंतरही मंत्री दीपक केसरकर यांनी कंपनीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.