Download App

नावाप्रमाणेच विवेक अन् आडनावाप्रमाणे आतून गोड, नांगरे पाटलांची फणसाळकरांसाठी खास पोस्ट

विवेक फणसाळकर यांच्यासाठी आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangre Patil) यांनी खास पोस्ट लिहिली आहे.

  • Written By: Last Updated:

Vishwas Nangre Patil : मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळक (Vivek Phansalkar) हे आज आपल्या सेवेतून निवृत्त होत आहेत. फणसाळकर सेवानिवृत्त झाल्यानंतर देवेन भारती (Deven Bharti) यांच्याकडे मुंबई पोलीस आयुक्तपदाची (Mumbai Police Commissioner) धुरा सोपवण्यात आली. दरम्यान, ३५ वर्षांच्या अत्यंत प्रभावी पोलिस सेवेनंतर निवृत्त होत असलेल्या फणसाळकर यांच्यासाठी आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangre Patil) यांनी खास पोस्ट लिहिली आहे.

एकनिष्ठचे फळ! मुंबई पोलीस आयुक्त पदी देवेन भारती 

विश्वास नांगर पाटील यांनी इंस्टाग्रामवर अकाऊंटवर एक पोस्ट लिहिली. त्यात त्यांनी म्हटलं की, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर सर आज आपल्या तब्बल ३५ वर्षाच्या सचोटीबद्ध, निष्कलंक आणि अत्यंत प्रभावी पोलीस सेवेनंतर निवृत्त होत आहेत. नावाप्रमाणेच विवेक आणि आडनावाप्रमाणे आतून गोड आणि बाहेरून कडक असणारे फणसाळकर सर पोलीस दलाचे आवडते ताईत झाले आहेत. प्रसन्न, हजरजबाबी, मिश्किल आणि प्रचंड बुद्धिमान असणारे हे व्यक्तिमत्व बोलता बोलता कोणाची कशी फिरकी घेईल, याचा नेम नसतो. अशाच एका सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात ते पोलीस पत्नींना उद्देशून म्हणाले की पूर्वी घरात अर्धा माणूस आणि फुल्ल पगार असायचा आतामात्र आजपासून पूर्ण माणूस आणि अर्धा पगार मिळणार !

घटस्फोटामुळे तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होतो?, रिपोर्टसाठी महत्वाचे मुद्दे काय आहेत? 

….अन् उच्चारांवर सरांचा क्लास सुरु व्हायचा

पुढं त्यांनी लिहिलं की, त्यांचे इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषांवरचे प्रभुत्व असामान्य ! पण सर मराठीचा आणि महाराष्ट्र धर्माचा कमालीचा आग्रह धरतात. थेट आयपीएस अधिकारी भेटल्यावर त्यांच्या भाषेतील व्याकरण आणि उच्चारांवर सरांचा क्लास सुरु व्हायचा. पण सर तेवढेच प्रेमळ, सहृदय आणि दिलदार! निर्णय क्षमता कमालीची. कोणतेही काम ‘ योग्य, आवश्यक आणि शक्य ‘असेल तर ते करायचेच हा त्यांचा मूलमंत्र होता. अवघड असे कायदा आणि सुव्यस्थेचे प्रसंग त्यांनी लीलया हाताळले. मी त्यांच्या अधिपत्याखाली मुंबईचा कायदा आणि सुव्यवस्थेचा सह आयुक्त म्हणून सहा महिने काम पाहिले, असंही पाटील यांनी म्हटलं.

दोन दसरा मेळाव्याचा किस्सा
शिवसेनेच्या एका वेळी होणाऱ्या दोन दसरा मेळाव्याचे नियोजन आणि बंदोबस्त करताना आमची त्रेधातिरपीट उडाली होती. पण सरांचे शांत शब्द आणि सततच्या प्रोत्साहनामुळे एकही अनुचित प्रसंगाविना हे बंदोबस्त पार पडले, असंही पाटील म्हणाले.

अत्यंत कुटुंबवत्सल असणाऱ्या फणसाळकर कुटुंबात श्री गणेशाच्या आशीर्वादाने कर्तृत्व आणि बुद्धीचा वारसा पुढे चालू आहे. श्रीमती मेघा मॅडम उच्च विद्याविभूषित असून स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातूम समाजोपयोगी उपक्रम राबवतात. या वयातही त्यांचे घुडसवारीचे कसब वाखाणण्याजोगे आहे. सरांची दोन्ही मुले आपापल्या क्षेत्रांतील उत्तुंग शिखरे काबीज करीत आहेत.

सर अजूनही विशीतल्या तरुणासारखी शरीरयष्टी बाळगतात. निश्चितच त्यांच्या प्रगाढ ज्ञानाचा, अनुभवाचा आणि उत्तुंग व्यक्तित्वाचा फायदा नव्या पिढीला होईल. ते जे काय त्यांच्या दुसऱ्या इंनिंगमध्ये करतील ते रचनात्मक, होकारात्मक आणि उत्तमच असेल. समाजभान असणाऱ्या अशा जाणत्या अधिकाऱ्याच्या दैपिप्यमान आणि यशोदायी दुसऱ्या सत्रातील कारकिर्दीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा, अशा शब्दात नांगरे पाटलांनी फणसाळकर यांच्यासाठी खास पोस्ट लिहत आठवणींना उजाळा दिला.

follow us