पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी नक्की कोणाला संधी मिळणार ? याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) हे आज दिल्लीहून थेट पुण्यात येणार आहेत. त्यामुळे पुण्यातील कसबा आणि चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी भाजप उमेदवार घोषित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
काल दिल्लीमध्ये भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होती. याच बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले होते. त्रिपुरा, मेघालय आणि नागालॅंड राज्यातील विधानसभा निवडणूकाच्या उमेदवारांच्या अंतिम यादीवर शिक्कामोर्तब करण्यासाठी भाजपची बैठक झाली. याच बैठकीत पोटनिवडणुकीच्या उमेदवारांबद्दलही चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे आज उमेदवार जाहीर होतील अशी शक्यता आहे.
कसबा आणि पिंपरी या दोन्ही पोटनिवडणुकांसाठी इच्छुकांची नावे केंद्रीय समितीकडे पाठवण्यात आली आहेत, अशी माहिती पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राज्यातील भाजपकडून केंद्रीय निवड समितीला ५ नावांचा प्रस्ताव पाठवला आहे. त्यामुळे अंतिम निर्णय केंद्रीय समितीकडून जाहीर केला जाईल. असं सांगण्यात येत आहे.
प्रदेश भाजपकडून पाठवण्यात आलेल्या पाच नावामध्ये भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील शैलेश टिळक आणि कुणाल टिळक या दोन नावांचा समावेश आहे. याशिवाय पुण्यातील भाजपचे नगरसेवक हेमंत रासने, गणेश बीडकर आणि धीरज घाटे यांचीही नावे निवड समितीला देण्यात आली आहेत. येत्या तीन दिवसात भाजपच्या केंद्रीय निवड समितीकडून निश्चित उमेदवारावर शिक्कामोर्तब करण्यात येईल. असं सांगण्यात येत आहे.