Maharashtra Monsoon Session 2023 : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची सुरुवात जोरदार खडाजंगीने झाली. याचा प्रत्यय विधानसभेचे कामकाज सुरु झाल्यानंतर काही मिनिटांतच आला. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची विधानसभेत ओळख करुन देताना विरोधकांनी मुख्यमंत्री आणि अजित पवार यांना चांगलेच चिमटे काढले.
दरम्यान विधानसभेच्या पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार सभागृहाचे कामकाज सुरु झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नव्या मंत्र्यांची सभागृहाला ओळख करुन देण्याची सूचना केली. त्यानुसार शिंदेंनी आपल्या जागेवर उभे राहून नव्या मंत्र्यांची माहिती देण्यास सुरुवात केली. त्यांनी पहिले नाव अजित पवारांचे घेतल्यामुळे त्यावर विरोधी बाकावर काहीतरी प्रतिक्रिया येणार हे निश्चित होते. झालेही तसेच…
एकनाथ शिंदेंचा पॉज
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवारांची ओळख करुन देताना उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री म्हणाले व थांबले. त्यांनी समोरच्या बाकावर बसलेल्या अजित पवारांकडे पाहिले. ते पाहून त्यांच्या बाजूला बसलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना नाव सांगा असा इशारा केला. त्यानंत शिंदेंनी अजित पवार यांचे नाव घेऊन त्यांची सभागृहाला ओळख करुन दिली.
आरोपांच्या फैरी झाडणाऱ्या नीलम गोऱ्हेंची CM शिंदेंसाठी बॅटिंग
सभागृहात पिकला हशा
शिंदेंनी ओळख करुन दिल्यानंतर अजित पवारांनी जागेवर राहत सर्वांना नमस्कार केला. त्यांचे अभिवादन केले. तेवढ्यात समोरील विरोधकांच्या बाकावर बसलेले राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवारांच्या गटाचे आमदार जयंत पाटील यांनी त्यांना टोला हाणला. त्यांची अन् आमची जुनी ओळख आहे, असे ते म्हणाले. त्यांच्या या विधानावर सभागृहात हशा पिकला. अजित पवारांना स्वत:ही हसू आवरता आले नाही.
त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आत्राम, संजय बनसोड, आदिती तटकरे, अनिल पाटील या नव्या मंत्र्यांचीही ओळख करुन दिली.