Download App

महाराष्ट्र केसरी किताब पटकावणारा शिवराज राक्षे आहे तरी कोण?

पुणे : यंदाचा महाराष्ट्र केसरी किताब नांदेडचा पैलवान शिवराज राक्षे यानं पटकावलाय. महाराष्ट्र केसरी 2023 च्या अंतिम लढतीमध्ये शिवराजनं सोलापूरच्या महेंद्र गाडकवाडचा अवघ्या 55 सेकंदात पराभव केलाय आणि महाराष्ट्र केसरीच्या मानाच्या किताबावर नाव कोरलंय.

शिवराज राक्षे हा पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथील राक्षेवाडीचा आहे. तो आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल कात्रज येथे वस्ताद काका पवार आणि गोविंद पवार यांच्याकडं सराव करतोय. तर उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्याच्या शिरसीचा आहे. तो आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल कात्रज येथे वस्ताद काका पवार आणि गोविंद पवार यांच्याकडंच सराव करतो. एकाच तालमीच्या मल्लांमध्ये महाराष्ट्र केसरीसाठी लढत झाल्याचं पाहायला मिळाली.

शिवराज पुण्याच्या खेड तालुक्यातील असला तरी तो सध्या नांदेड जिल्ह्याचं प्रतिनिधीत्व करतो. त्यानं कनिष्ठ गटात आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचं प्रतिनिधीत्व केलंय. गतवर्षीच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतून खांद्याच्या दुखापतीमुळं त्यानं माघार घेतली होती. गतवर्षीच महाराष्ट्र केसरीच्या संभाव्य विजेत्यांमध्ये त्याची गणणा केली जात होती. यंदा मात्र त्यानं दुखापतीवर मात करून महाराष्ट्र केसरीचा किताब मिळवण्यासाठीच तो मैदानात उतरला होता. अखेर त्यानं महाराष्ट्र केसरीचं स्वप्न यंदा पूर्ण केलंय.

शिवराजचे वडील शेती करतात. शेतीसोबत दुधाचा जोडधंदा करतात. आई, वडील आणि भाऊ यांच्यासोबत शिवराज खेडमध्ये राहतो. शिवराजला आजोबापासून कुस्तीचा वारसा आहे. शिवराजच्या वडीलांसह आजोबाही दोघेही पैलवान होते. त्यांचाच वारसा शिवराजनं पुढं चालवत आज महाराष्ट्र केसरीवर आपलं नाव कोरलंय.

Tags

follow us