Download App

‘आमदार फोडू नका, पक्ष उभा करायला शिका’; राज ठाकरेंनी भाजपलाही धुतलं

Raj Thackeray Panvel : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा निर्धार मेळावा आज पनवेल येथे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीसह भाजप आणि अजित पवार गटावर जोरदार प्रहार केले.

नाशिक येथील टोलनाक्यावर मनसे नेते अमित ठाकरे यांची गाडी अडवली म्हणून मनसैनिकांची टोलनाक्याची तोडफोड केली होती. या प्रकरणावर भाजपने ही दादागिरी महाराष्ट्रात चालणार नाही. टोल फोडण्यापेक्षा टोल बांधायला शिका असा टोला भाजपने लगावला होता. राज ठाकरे यांनी आज मेळाव्यात हा मुद्दा उपस्थित करत भाजपला थेट इशाराच दिला. राज ठाकरे म्हणाले, मी देखील भाजपला सांगतो की इतरांचे आमदार फोडून आपला पक्ष उभा करण्यापेक्षा स्वतःच स्वतःचा उभा करायला भाजपने शिकावे.

खोके-खोके ओरडणाऱ्यांकडे ‘कंटेनर’, त्यांनी कोविडही सोडला नाही; राज ठाकरेंचा घणाघात

अजित पवारांवर राज ठाकरेंचा हल्लाबोल

अजित पवार आणि शरद पवार यांच्या गुप्त भेटीची जोरदार चर्चा सुरू आहे. पुण्यात शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर अजित पवार माध्यमांपासून लपण्यासाठी कारमध्ये झोपून गेले, असा आरोप होत आहे. मात्र अजित पवारांनी आपण त्या गाडीत नव्हतोच असे सांगितले होते. यावरून अजित पवारांची नक्कल करत राज ठाकरेंनी त्यांची खिल्ली उडवली. राज ठाकरे म्हणाले, अजित पवार म्हणतात तो मी नव्हतोच. तो मी नव्हतोच. तुम्हीच बघा भाजपसोबत येणारे आता गाडीत झोपून जात आहेत. वर तो मी नव्हतोच असे सांगणे म्हणजे निर्लज्जपणाचा कळस आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली.

समृद्धी महामार्गावर कुंपण तरी टाका 

मी नितीन गडकरींना फोन केला. समृद्धी महामार्गावर प्राणी येतात. लोक वेगाने जातात. अचानक प्राणी आला काय करणार? साडेतीनशे माणसं मेलीत त्या रस्त्यावर. मी फडणवीसांशी बोललो त्यांनी गडकरींशी बोलायला सांगितले. त्यामुळे समृद्धी महामार्गावर तत्काळ कुंपण टाकले गेले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

राज ठाकरेंनी हिंदुत्वावरुन कूस बदलली; निवडणुकांपूर्वी पुन्हा खेळलं मराठी कार्ड?

मुंबई गोवा महामार्गावर अडीच हजार माणसांचा मृत्यू

या रस्त्यावर किती खर्च झाला याची कल्पना आहे का. मुंबई-गोवा महामार्गावर 15 हजार 566 कोटी रुपयांचा खर्च झाला. तरी अजूनही रस्ता झालेला नाही. मी नितीन गडकरींना फोन केला. त्यावर गडकरी म्हणाले कंत्राटदार पळून गेले काही लोक कोर्टात गेले असे त्यांनी सांगितले. यामागे नेमकं काय. काही कट तर नाही ना असा संशय व्यक्त करत या महामार्गावर आतापर्यंत मुंबई गोवा महामार्गावर दहा वर्षात अडीच हजार माणसं मेली असे राज ठाकरे यांनी सांगितले.

Tags

follow us