Mumbai University Election : मुंबई विद्यापीठाच्या निवडणुकीबाबत महत्वाची बातमी हाती आली आहे. आज शुक्रवारी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटचा दिवस असताना अचानक आदल्या दिवशी निवडणूक स्थगित करण्यात आल्याचे परिपत्रक जारी करण्यात आले. अवघ्या दहा दिवसात निवडणुका स्थगित केल्याने विद्यार्थी संघटनांत नाराजी पसरली आहे. स्थगित केलेल्या निवडणुका कधी होणार याचे काहीच स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
मुंबई विद्यापीठातील दहा सिनेट सदस्यांसाठी ही निवडणूक होणार होती. एक आठवड्याआधीच निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. 18 ऑगस्ट हा अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. 10 सप्टेंबर रोजी मतदान आणि 18 सप्टेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केल जाणार होता. 95 हजार तरूण मतदानाचा हक्क बजावणार होते. निवडणुकीची सगळी तयारी झालेली असताना अचानक काल रात्री परिपत्रक काढण्यात येऊन निवडणूक स्थगित केल्याचे सांगण्यात आले. निवडणूक का स्थगित करण्यात आली याचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.
कोविड सेंटर घोटाळा; संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजित पाटकरांना 5 दिवसांची पोलिस कोठडी
निवडणुका रद्द झाल्याने मनसे आणि ठाकरे गटाने राज्य सरकारवर हल्लोबोल केला आहे. विद्यापीठाने जाहीर केलेली निवडणूक 10 सप्टेंबरला होणार होती. या निवडणुकीसाठी ठाकरे गट आणि मनसेने चांगली तयारी केली होती. मात्र सरकारच्या या निर्णयाने नाराजी पसरली आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ही मुंबईतील पहिलीच मोठी निवडणूक होती.
ठाकरे गटाची युवासेना आणि मनसेची विद्यार्थी सेना यांनी मतदार नोंदणीसाठी प्रयत्न केले होते. या दोन संघांमध्येच सामना होईस असेही सांगितले जात होते. त्यामुळे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्य फूट पडल्यानंतर मुंबईत होणाऱ्या या पहिल्याच निवडणुकीत दोन्ही संघटना त्यांचे नेते म्हणजे आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यात थेट सामना होईल अशी परिस्थिती होती.
मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक अचानक स्थगित करून टाकली!
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यावर असे करणे हे बेकायदेशीर आणि घाबरटपणाचे लक्षण आहे.
आपण जिंकणार नाही म्हणून कोणत्याच निवडणूका नकोत, अगदी विद्यापीठाच्या पण नकोत हे लोकशाहीला प्रचंड घातक आहे.
निषेध !
— Varun Sardesai (@SardesaiVarun) August 17, 2023
निवडणूक अचानक रद्द झाल्यानंतर ठाकरे गटाचे नेते संतप्त झाले आहेत. मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक अचानक स्थगित करून टाकली. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यावर असे करणे बेकायदेशीर आणि घाबरटपणाचे लक्षण आहे. आपण जिंकणार नाही म्हणून कोणत्याच निवडणुका नकोत, अगदी विद्यापीठाच्या पण नकोत हे लोकशाहीला प्रचंड घातक आहे, निषेध! अस ट्विट ठाकरे गटाचे नेते वरुण सरदेसाई यांनी केले आहे.