Download App

‘बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली, जरुर गद्दार दिन साजरा करा’; केसरकरांचा उद्धव ठाकरेंना टोला

Deepak Kesarkar : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आज खोके दिन, गद्दार दिन साजरा करण्यात येत आहे. यावरून राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. शिंदे गटातील नेते ठाकरे गटावर संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी ठाकरे गटावर कडाडून टीका केली आहे. आज नवी मुंबईतील खारघर येथे रन फॉर एज्युकेशन रॅली आयोजित करण्यात आली होती. या उपक्रमाला केसरकर यांनी हजेरी लावली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

केसरकर म्हणाले, 80 टक्के समाजकारण, 20 टक्के राजकारण बाळासाहेबांच्या शिकवणीप्रमाणे ते वागले नाहीत. ते शंभर टक्के राजकारण करतात. त्यांनी गद्दार दिन जरूर साजरा केलाच पाहिजे कारण त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली. बाळासाहेबांचे विचार सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पायावर लोळण घेतली. हळू हळू बंडाचे खरे स्वरुप लोकांसमोर येत आहे. हे बंड स्वाभिमानासाठी झाले होते.

‘डॉक्टर एकनाथ शिंदेंमुळे गळ्यातला पट्टा गेला, चालायला लागले’

आमच्यासारखे आमदार दोन दोन तीन महिने वर्षा बंगल्या बाहेर उभे राहिले हा आमचा अपमान नाही का असा सवाल केसरकर यांनी केला. पंतप्रधान मोदी यांच्यावर ज्या पद्धतीने टीका केली जात आहे ते योग्य नाही. जम्मू काश्मिरातील कलम 370 हटवणे, राम मंदिराची उभारणी हे बाळासाहेबांचे स्वप्न होते ते स्वप्न मोदींनी पूर्ण केले त्यामुळे त्यांच्यावर टीका करणे योग्य नाही, असे केसरकर म्हणाले.

संजय राऊतांचे थेट संयुक्त राष्ट्रांना पत्र

शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्या बंडाला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. शिवसेनेतील हे आजपर्यंतच सर्वात मोठं बंड होतं. गेल्या वर्षी 20 जूनला विधानपरिषदेचे मतदान संपल्यानंतर त्याच दिवशी रात्री एकनाथ शिंदे सोळा आमदारांसह नॉटरिचेबल झाले होते. त्या रात्री ते सुरतला गेले. शिंदेंच्या बंडाची कुणकुण लागताच महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला होता. त्याला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. आजचा दिवस म्हणजे 20 जून हा जागतिक गद्दार दिन म्हणून जाहीर करा, या मागणीचे पत्र खासदार संजय राऊत यांनी संयुक्त राष्ट्र संघटनेला लिहिले आहे.

‘शिंदे गुवाहाटीत नव्हे अयोध्येत करणार होते बंड’; ठाकरे गटाच्या आमदाराचा गौप्यस्फोट

संजय राऊत यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की 20 जून 2022 रोजी महाराष्ट्रात विधानपरिषदेची निवडणूक झाली, त्याच रात्री शिंदे आणि आमदार सुरतच्या दिशेनं रवाना झाले होते. पहाटेच्या सुमारास एकनाथ शिंदे हे 16 आमदारांसह संपर्काबाहेर असल्याचे लक्षात आले. त्यानंतर राज्याचा राजकारणात एकच खळबळ उडाली. शिवसेनेच्या 40 आमदारांसह 52 आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सूरत आणि तेथून गुवाहाटीला रवाना झाले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले.

Tags

follow us