Download App

महापालिका निवडणूक भाजप स्वबळावर लढणार? चाचपणी सुरू; पडद्यामागे काय घडतंय..

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची चाचपणी भाजपने सुरू केल्याची माहिती मिळाली आहे. 

Maharashtra Politics : राज्यातील विधानसभा निवडणुकीतील प्रचंड यशानंतर आता महायुतीने स्थानिक स्वराज्य संस्थांकडे मोर्चा वळवला आहे. महायुतीतील पक्षांनी या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडीनेही मोर्चेबांधणी केली आहे. परंतु, महाविकास आघाडीत खटके उडू लागले आहेत. स्वबळाची चाचपणी सुरू आहे. आता या वादाचं आणि स्वबळाचं लोण महायुतीतही आलं आहे. महायुतीतील घटक पक्ष स्वबळाची भाषा बोलू लागल्याने महायुतीत मिठाचा खडा पडला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची चाचपणी भाजपने सुरू केल्याची माहिती मिळाली आहे.

खुर्चीदर्शन झाल्याने तीर्थदर्शन योजना बंद होणार, लाडक्या बहिणींचा आकडाही.. वडेट्टीवारांची महायुतीवर टीका

भाजपकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आढावा घेतला जात आहे. स्थानिक पातळीवर बैठका सुरू आहेत. या बैठकांत निवडणूक स्वबळावर लढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे निवडणुका कशा पद्धतीने लढायच्या याचा अंदाज येऊ लागला आहे. परंतु, दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र एकत्रित निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचे दिसत आहे. एकनाथ शिंदे यांच्या या भुमिकेमुळे महायुतीत संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.

मागील काही दिवसांपासून एकनाथ शिंदे नाराज आहेत. मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे यांच्यात शीतयुद्ध सुरू असल्याच्याही चर्चा आहेत. त्याचीही किनार या चाचपणीला आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे भाजपकडून आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा पवित्रा घेतला जात आहे का असाही प्रश्न आहे. महायुतीत मात्र याबाबतीत अद्याप स्पष्टता नाही. निवडणुका एकत्रित लढायच्या की स्वबळावर याचा अंतिम निर्णय झालेला नाही.

अजित पवार गटाचाही वेगळा सूर

दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मागील महिन्यात अजित पवार गटाची बैठक माटुंगा येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत नवाब मलिक यांनी स्वबळाचा नारा दिला. महापालिका निवडणूक आता स्वबळावरच लढली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून पक्षाला अजूनही मुंबई जिंकता आलेली नाही. येथील यश फार नाही. महायुती म्हणून लढायचं की स्वतंत्र लढायचं याबाबतचा संभ्रम कार्यकर्त्यांच्या मनात कायम आहे, असेही नवाब मलिक यावेळी म्हणाले होते.

स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे वेगळी असतात. त्यामुळे या निवडणुका स्वबळावर लढण्याचा ट्रेंड दिसून येतो. आताही याच पद्धतीने तयारी केली जात आहे. महाविकास आघाडीतही अशीच परिस्थिती दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा नारा दिला होता. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अस्वस्थता वाढली होती. या आघाडीतही निवडणुकीबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.

महायुतीत ट्विस्ट! मनपा निवडणुका स्वबळावर लढा; अजित पवार गटाच्या नेत्याचा वेगळा सूर

follow us