खुर्चीदर्शन’ झाल्याने तीर्थदर्शन योजना बंद होणार, लाडक्या बहिणींचा आकडाही…; वडेट्टीवारांची महायुतीवर टीका
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी आधी महायुती (Mahayuti) सरकारने मतांसाठी विविध योजनांची घोषणा केली, तेव्हा तिजोरीकडे बघितले नाही. आता मात्र एकामागून एक योजना बंद करण्याची तयारी आहे. आता खुर्चीदर्शन झाल्याने मुख्यमंत्री तीर्थदर्शन, आनंदाचा शिधा, शिवभोजन थाळी (Shivbhojan Thali) या योजना बंद करण्याची महायुतीची तयारी सुरू असल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केली.
मुंबईत पत्रकारांशी विजय वडेट्टीवार यांनी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. महायुती सरकारवर टीका करतांना ते म्हणाले की, मतांसाठी योजनांचा गाजावाजा करत घोषणा केल्या, तेव्हा तिजोरीकडे बघितलं नाही. आता सत्ता आल्यावर या योजना महायुती सरकार बंद करत आहे. पैसे नसल्याने लाडकी बहिण योजनेतही अटी शर्ती-लागू करून लाभार्थी महिला काही लाखात आणण्याचा सरकारचा घाट आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
सुरेश धस दुटप्पी माणूस..
भाजप आमदार सुरेश धस यांनी सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात पोलिसांवर गुन्हे दाखल करणे संयुक्तिक होणार नाही, असं विधान केला. यावरही वडेट्टीवार यांनी भाष्य केलं. सुरेश धस यांचा हा दुटप्पीपणा आहे. एका दलित व्यक्तीचा खून होतो, तेव्हा पोलिसांना संरक्षण देण्याची भाजप आमदाराची भाषा ही जातीय द्वेष निर्माण करणारी आहे. कोणीही दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे, असे वडेट्टीवार म्हणाले.
राहुल सोलापूरकवर कारवाई करणार का?
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले. त्यांच्या विरोधात सरकार कारवाई का करत नाही? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. निवडणुकीत छत्रपती शिवाजी महाराज, डॉ आंबेडकर यांची नावं घ्यायची आणि मतं मिळवायची. पण, सत्ता आल्यावर जेव्हा या महापुरुषांचा कोणीही अहिरा गहिरा अवमान करतो, तेव्हा सरकार कारवाई करत नाही. सोलापुरकर कोणाच्या इशाऱ्यावर अशी वक्तव्य करत आहेत, असा सवाल वडेट्टीवार यांनी केला.
रणवीर अलाहाबादियाच्या वडेट्टीवार काय म्हणाले?
जे वक्तव्य आहे ते अतिशय घाणेरडे आहे, रणवीरवर गुन्हा दाखल करून कारवाई केली पाहिजे. आई-वडील यांच्या विरोधात जे शब्द वापरले, तो कोणत्याही आईवडिलांचा अपान आहे. असे शो बंद केले पाहिजे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.