Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यापासून पक्षाला मोठी गळती लागली आहे. त्यामुळे ठाकरे गटाकडून नवे मित्र शोधण्यावर आणि टिकवण्यावर भर दिला जात आहे. संभाजी ब्रिगेड संघटना ठाकरे गटाच्या साथीला आहे. आता या दोन्ही पक्षांची संयुक्त बैठक उद्या (रविवार) मुंबईतील रंगशारदा सभागृहात होत आहे.
या बैठकीला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, सुभाष देसाई संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडचे राज्य पदाधिकारी आणि जिल्हाप्रमुख, जिल्हा सचिव उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला राज्यातून संभाजी ब्रिगेडचे 300 आणि ठाकरे गटाचे 300 असे एकूण 600 पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत आगामी निवडणुका, शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडची राजकीय वाटचाल या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे, अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी दिली.
शिवसेनेच्या संपत्तीवरुनही मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंना घेरलं! म्हणाले, फक्त पैशांबद्दलच..,
याआधी मे महिन्यात बैठक झाली होती. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले होते. त्यानंतर आता उद्या मुंबईत दोन्ही पक्षांची महत्वाची बैठक होत आहे. राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता या बैठकीला महत्व प्राप्त झाले आहे. आता या बैठकीत काय निर्णय होतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाची बैठक होत आहे. राष्ट्र्वादीत फूट पडल्यानंतर पक्ष बांधणीसाठी अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे आगामी काळातील त्यांचा दौरा, पक्ष चिन्हाचा वाद, प्रतिज्ञापत्र भरण्यासाठी तयारी या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.