Maharashtra Rain Update : गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने (Maharashtra Rain) मुंबईला अक्षरशः झोडपून काढले होते. मात्र, आज सकाळपासून पावसाचा जोर काहीसा ओसरल्याचे दिसून आले. अनेक भागात पावसाने विश्रांती घेतली असली तरी, काही ठिकाणी रिमझिम ते हलक्या सरी (Rain Update) सुरूच आहेत. खबरदारी म्हणून मुंबईसाठी (Mumbai Rain) हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
मुंबईबरोबरच ठाणे, पालघर आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठीही ऑरेंज अलर्ट लागू ठेवण्यात आला आहे. याआधी गेले 48 तास संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात (MMR) रेड अलर्ट लागू होता. मुसळधार पावसानंतर हवामान विभागाने हा अलर्ट कमी करून ऑरेंज केला आहे. दुपारपर्यंत मुंबईत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याउलट रायगड जिल्ह्यासाठी आजही रेड अलर्ट कायम आहे. रायगडसह पुणे, नाशिक आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावरील भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यात मात्र पावसाचा जोर काहीसा कमी झाला असून पूरग्रस्त नागरिकांना दिलासा मिळत आहे. विदर्भात आज यलो अलर्ट देण्यात आला असून विजांसह पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
मोठी बातमी! ऑनलाइन गेमिंग बील लोकसभेत सादर; वाचा, कायदा मोडणाऱ्याला काय शिक्षा होणार?
12 तासांपासून वीजपुरवठा खंडित
कालच्या मुसळधार पावसामुळे वसई, विरार आणि नालासोपारा परिसरात पाणी साचले. अनेक सोसायट्यांच्या सखल भागात पाणी शिरल्याने मीटर बॉक्सपर्यंत पाणी गेले. खबरदारी म्हणून महावितरणने वीजपुरवठा बंद केला होता. काही भागातील पाणी ओसरल्यावर ट्रान्सफॉर्मर सुरू करण्यात आले, पण अजूनही काही वसाहतींमध्ये 12 तासांपासून वीज नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांचे हाल होत आहेत.
नाशिकमध्ये नदी पात्र फुगलं
नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्याने गोदावरी नदीच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. रामकुंड परिसरात पानवेली वाहून आल्याने परिसर व्यापला आहे. सध्या 2,557 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत असून पुढील काही तासांत विसर्ग वाढवला जाणार आहे. त्यामुळे गोदाकाठच्या मंदिरांना पाणी लागण्यास सुरुवात झाली आहे.सातारा जिल्ह्यात पावसाने पुन्हा धुमाकूळ घातला आहे. महाबळेश्वर-पाचगणी परिसरात आणि कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे कोयना, धोम-बलकवडी, उरमोडी आणि तारळी धरणांतून विसर्ग करण्यात आला आहे.
मोदी सरकारच्या विधेयकाने अमित शाहांचीच कोंडी? Grok चा उल्लेख करत अंधारेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल
पालघरमध्ये धरणं भरली
पालघर जिल्ह्यात पावसाच्या अधूनमधून सरी सुरू असून सूर्या प्रकल्पातील धामणी धरण 100 टक्के भरल्याने सर्व दरवाजे अंशतः उघडण्यात आले आहेत. धामणी आणि कवडास धरणांतून मिळून जवळपास 8,475 क्युसेक पाण्याचा विसर्ग सूर्या नदीमध्ये होत आहे. नदीला पूर आला असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
कोकण रेल्वे मार्गावर गाड्या रद्द
मुंबई व कोकणात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका रेल्वे प्रवासालाही बसला आहे. कोकण रेल्वे मार्गावरील मुंबई-मडगांव जनशताब्दी एक्सप्रेस (अप व डाऊन) तसेच मुंबई-मडगांव वंदे भारत एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. अनेक गाड्या उशिराने धावत आहेत.गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा फटका बसणार आहे. मुंबईतून गावाकडे जाणाऱ्यांचा प्रवास विस्कळीत झाला आहे.