Download App

शिंदेंचं ठरलं! उत्तर पश्चिम मुंबईतून रवींद्र वायकरांना उमेदवारी जाहीर

लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.

Mumbai Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या (Eknath Shinde) शिवसेनेत वायकर यांनी काही दिवसांपूर्वी प्रवेश केला होता. त्यानंतर आज लगेच त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट देण्यात आलं. या निर्णयाची माहिती एकनाथ शिंदे शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून देण्यात आली आहे. या मतदारसंघात ठाकरे गटाने खासदार गजानन किर्तीकर यांचा मुलगा अमोल किर्तीकर यांना तिकीट दिलं आहे.

वायकर यांची ईडीकडून चौकशी सुरू होती. त्यामुळं वायकर हे शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. त्यानंतर मागील महिन्यात त्यांनी ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेना महायुतीचा घटक पक्ष आहे, आणि आता वायकर महायुतीचा भाग झाले. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे किरीट सोमय्यांनी आरोप केले, ते सर्वच नेते एक एक करून महायुतीत येत आहेत.

आता तर मागील महिन्यातच शिवसेनेत आलेल्या वायकर यांना थेट लोकसभेची उमेदवारी देण्यात आली.  उत्तर पश्चिम मतदारसंघातून कुणाला उमेदवारी द्यायची असा प्रश्न शिंदेंसमोर होता. अभिनेता गोविंदा यांच्या नावाचीही चर्चा सुरू होती. परंतु, वायकरांमुळे गोविंदाचं नाव मागे पडलं. काल रात्री ठाणयात एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी रवींद्र वायकर चर्चेसाठी गेले होते. यावेळी दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली.

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? गोविंदाने स्पष्टच सांगितले

या बैठकीनंतर वायकरांची उमेदवारी निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे. वायकर उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या मतदारसंघातून आधी विद्यमान खासदार गजानन किर्तीकर यांच्या नावाची चर्चा होती. परंतु, या निवडणुकीतून त्यांनी माघार घेतली. त्यामुळे शिंदे गटाकडून दुसऱ्या उमेदवाराचा शोध सुरू होता.

या मतदारसंघातून ठाकरे गटाने खासदार गजानन किर्तीकर यांचा मुलगा अमोल किर्तीकर यांना तिकीट दिलं आहे. त्यामुळे आता या दोघांत लढत निश्चित झाली आहे. या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होत आहे. वायकर यांनी ऐन मोक्याची क्षणी उद्धव ठाकरेंची साथ सोडली. त्यामुळे ठाकरे गटातील नेते त्यांच्यावर नाराज आहेत. त्यांच्या वक्तव्यांतून नाराजी दिसूनही येत आहे. आता वायकर थेट निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे आगामी काळात ईडी चौकशी, घोटाळ्यांचे आरोप ठाकरे गटाच्या प्रचारात दिसतील.

रवींद्र वायकर मुंबईतील जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. 1992 पासून सलग चार वेळी नगरसेवक म्हणून ते मुंबई महापालिकेत निवडून आले होते. 2006 ते 2010 या काळात वायकर महापालिकेत स्थायी समितीचे अध्यक्षही होते. 2009 मध्ये विधानसभा आमदार झाले. यानंतर सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून  आले आहेत. 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपदही भुषवलं आहे.

MVA Meeting Mumbai : लोकसभेसाठी मविआची 4 तास खलबतं; राऊतांनी सांगितलं आंबेडकरांच्या प्रस्तावाचं गणित

 

follow us