Mahayuti or MVA who will win 6 Lok Sabha Mumbai Seats : मुंबईमध्ये लोकसभेच्या ( Lok Sabha Mumbai Seats ) सहा जागा आहेत. त्यामुळे राज्यातील मुंबईचा गड राखणे महायुती ( Mahayuti ) आणि महाविकास आघाडीसाठी ( MVA) महत्त्वाचं असणार आहे. त्यामध्ये 2019 च्या निवडणुकीत मुंबईतील सर्व जागा भाजप आणि शिवसेनेच्या युतीने जिंकल्या होत्या. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन गट झाले आहेत. त्यामुळे आता राज्यातील मुख्य पक्षांची संख्या चार वरून थेट सहावर गेली आहे. त्याचबरोबर 2019 ला प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी आणि ओबीसी यांच्या एमआयएमचची आघाडी होती. तसेच 2019 ला मोदींना कडाडून विरोध करणारे राज ठाकरे देखील यावेळी भाजपच्या युतीला पाठिंबा देत आहेत.
बुलेट ट्रेनचा रिव्हर्स गिअर! चीनमधील रेल्वे स्टेशन्स का होताहेत धडाधड बंद?
त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्याप्रमाणे 2014 ला मोदी लाट होती. 2019 ला देखील पुलवामावरील हल्ला असो किंवा इतर देशभक्तीच्या मुद्द्यांची लाट होती. तशा प्रकारची कोणतीही लाट 2024 च्या निवडणुकीत दिसत नाही. विरोधकांची इंडिया आघाडी देखील यावेळी गेल्यावेळीच्या तुलनेत आक्रमक झाली आहे. त्यामुळे राज्य आणि देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या मुंबईच्या सहा लोकसभा मतदारसंघाचा गड महायुती राखणार की महाविकास आघाडी त्याला सुरुंग लावणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पाहुयात मुंबईच्या या सहाही मतदारसंघांमध्ये सध्या काय स्थिती आहे?
दक्षिण मुंबई :
पुर्वीच्या शिवसेनेने दक्षिण मुंबईची जागा दोन वेळा सलग जिंकली आहे. मात्र शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर दक्षिण मुंबईचे खासदार असलेले अरविंद सावंत हे शिवसेनेच्या ठाकरे गटामध्ये आहेत. यावेळी देखील ते दक्षिण मुंबईतून मैदानात उतरलेले आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेनेच्या शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांना उतरवण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये या मतदार संघात मुख्य लढत बघायला मिळत आहे. मात्र या मतदारसंघात इतर घटक देखील तेवढेच महत्त्वाचे ठरतील.
ते म्हणजे काँग्रेसकडून परंपरागत रित्या या मतदारसंघांमध्ये देवरा यांच्या कुटुंबामध्ये उमेदवारी दिली जात होती. मात्र सध्या मिलिंद देवरा यांनी निवडणुकीपूर्वीच भाजपची वाट धरली आहे. जातीय समीकरणाबद्दल बोलायचं झालं तर या मतदारसंघात जवळपास 25% मुस्लिम मतदार आहेत. जे यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. तर महायुतीचे भाजप आणि शिंदे यांची शिवसेना या जागेसाठी गुजराती आणि मारवाडी तसेच इतर उत्तर भारतीय मतदारांवर अवलंबून आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेला मुस्लिम मतदारांसह हा गड राखण्यात यश येणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दक्षिण-मध्य मुंबई :
दक्षिण मध्य मुंबईची लढत शिवसेनेच्या ठाकरे गटासाठी प्रतिष्ठेची लढाई आहे. कारण याच भागामध्ये शिवसेनेचे पक्ष कार्यालय आहे. त्याचबरोबर शिवसेनेचे येथील खासदार राहुल शेवाळे हे पक्ष फुटीनंतर शिंदेंसोबत गेले आहेत. त्यांना या वेळी देखील शिंदेगटाकडून उमेदवारी मिळाली आहे. तर ठाकरे यांनी शेवाळे यांच्या विरोधात अनिल देसाई यांना मैदानात उतरवले आहे. या मतदारसंघातील निवडणुकीतील महत्त्वाचा मुद्दा आहे. तो म्हणजे धारावी झोपडीच पुनर्विकास. या मुद्द्यावरून ठाकरे गटाने भाजप आणि शिंदे यांच्या सरकारचा कडाडून विरोध केला होता. त्यासाठी आंदोलन देखील काढली होती. याचा परिणाम होण्यावर देखील या मतदार संघातील विजयावर परिणाम करणारं ठरू शकतं.
उत्तर-मध्य मुंबई
मुंबईतील तिसरा मतदार संघ आहे तो म्हणजे उत्तर मध्य मुंबई हा मतदारसंघ यावेळी चर्चेत आहे तो म्हणजे 26 11 च्या दहशतवादी हल्ल्याच्या हायप्रोफाईल प्रकरणांमध्ये सरकारी वकिलांची भूमिका बजावणारे ज्येष्ठविधीज्ञ उज्वल निकम यांच्या उमेदवारीमुळे. या मतदारसंघांमध्ये एकीकडे महावितरण निकम यांना उमेदवारी दिल्यानंतर काहीसं नाराजी नाट्य पाहायला मिळालं होतं कारण भाजपने विद्यमान खासदार पूनम महाजन यांचे तिकीट कापून निकम यांना मैदानात उतरवलं. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यात देखील काँग्रेस नेते आरिफ नसून खान हे गायकवाड यांना उमेदवारी दिल्याने नाराज झाले होते. या मतदारसंघातील ध्रुवीकरणाचा मुद्दा आहे तो म्हणजे मुस्लिम मतदारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे आता या मतदारांच्या फायदा महाविकास आघाडीला होणार होणार का की, महायुतीतील अजित पवार गटात सामील झालेले काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या यानाने हे मुस्लिम मतदान भाजप आणि पर्यायाने महायुतीच्या पारड्यात पडणार का यावर सर्व गणित अवलंबून असणार आहे
उत्तर पश्चिम मुंबई :
2019 ला ही जागा शिवसेनेकडे होती. मात्र यावेळी पक्ष फुटीनंतर या जागेवर उमेदवारी देण्यावरून चांगलंच राजकीय नाट्यरंगलं होतं. त्याचं कारण म्हणजे सध्या शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये असलेले गजानन कीर्तिकर हे या मतदारसंघातील विद्यमान खासदार आहेत. मात्र कीर्तीकर हे जरी शिंदे गटात असले तरी त्यांचे पुत्र अमोल कीर्तीकर हे मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत.
ठाकरेंनी अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी दिल्याने पिता-पुत्रांमध्ये ही लढत होणार असल्याची चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र शिंदे गटाकडून या मतदारसंघात नुकतेच ठाकरे गटातून आलेले रवींद्र वायकर यांना उमेदवारी दिली. तर महाविकास आघाडीमध्ये ही जागा ठाकरे गटाला मिळाल्याने काँग्रेसमध्ये नाराजी झाली. ज्यामध्ये काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी सुरुवातीला उघडपणे नाराजी व्यक्त केली. ज्यावरून त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आलं. मात्र निरूपम यांनी आता शिंदे गटात प्रवेश केला आहे. याचा फायदा शिंदे गटाला होणार का हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.
उत्तर-पूर्व मुंबई :
मुंबईमध्ये नेहमीच चर्चेत असलेला मराठी आणि अमराठी भाषिकांचा मुद्दा या मतदारसंघातील ध्रुवीकरणाचा महत्त्वाचा घटक आहे. महायुतीतील भाजपकडे हा मतदारसंघ आहे. तर गेल्या तीन निवडणुकांपासून भाजपने वेगवेगळ्या उमेदवारांच्या माध्यमातून हा गड राखण्यात यश मिळवले आहे. यामध्ये 2014 ला किरीट सोमय्या यांनी विजय मिळवला होता. 2019 मध्ये मनोज कोटक यांनीही जागा राखली होती. तर यावेळी ही जबाबदारी भाजपकडून मिहीर कोटेचा यांच्यावर देण्यात आली आहे.
तर कोटेचा यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या ठाकरे गटाचे संजय पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पाटील यांनी 2009 साली राष्ट्रवादीच्या तिकिटावर ही जागा जिंकली होती. या ठिकाणी गुजराती विरुद्ध मराठी असा सामना रंगला आहे. दरम्यान शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून नुकत्याच काही दिवसांपूर्वी एका गुजराती सोसायटीमध्ये मराठी लोकांना राहण्याची परवानगी दिली जात नसल्याचे मुद्द्यावरून वाद निर्माण करण्यात आला होता. याचा फायदा ठाकरे गटाला होणार का हे चार तारखेला समोर येईल.
उत्तर मुंबई :
मुंबईतील शेवटची लोकसभेची जागा उत्तर मुंबई ही भाजपासाठी सर्वाधिक सुरक्षित मानली जाते. कारण 2004 आणि 2009 चा काँग्रेसला मिळालेल्या विजयाचा अपवाद सोडता. 1989 पासून लागोपाठ भाजपने उत्तर मुंबईचा गड राखला आहे. मात्र यावेळी भाजपकडून दोन वेळा खासदार राहिलेला गोपाळ शेट्टी यांचे तिकीट कापून केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना मैदानात उतरवलं आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे भूषण पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या मतदारसंघात देखील मराठी अमराठी किंवा बाहेरून आलेला उमेदवार अशा प्रकारचा प्रचार महाविकास आघाडीकडून केला गेला.
त्यामुळे जातीय समीकरण, भाषेचा मुद्दा, भूमिपुत्रांचा मुद्दा अशा वेगवेगळ्या मुद्द्यांच्या अवतीभवती मुंबईतील या सहाही लोकसभा जागांसाठी शेवटच्या टप्प्यात मतदान पार पडलं आहे. त्यामुळे आता येत्या चार तारखेला मुंबईच्या या सहाही मतदारसंघांसह हा गड महायुती राखणार की महाविकास आघाडी विजयश्री खेचून आणण्यात यशस्वी होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.