(अशोक देशमुख : टीम लेट्सअप)
नाशिक : स्वर्गीय गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचे राज्यभर चाहते आहेत. त्यांच्या निधनानंतर अनेकांनी शोक केला. समाजात मुंडे यांचे स्थान नेहमीच श्रद्धेचे राहिले आहे. नाशिक (Nashik) जिल्ह्यातील एका गावात मुंडे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला. त्याचा लोकार्पण सोहळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत झाला. मुंडे यांच्या निधनानंतर बहुदा प्रथमच गडकरी हे मुंडे यांच्याशी संबंधित कार्यक्रमाला आले असावेत. राजकीय क्षेत्रात अनेक वेळा मित्र हे शत्रू होतात आणि शत्रू हे मित्र होतात. ही प्रक्रिया सतत चालू असते.
केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर काही तासांनीच मुंडे यांचा दिल्लीत अपघात झाला. त्यांचा यात मृत्यू झाल्याचे कटूसत्य जाहीर करण्याची पाळी तेव्हा गडकरी यांच्यावर आली होती. त्यांनी ती पार पाडली. प्रमोद महाजन यांचे दुर्देवाने निधन झाले. मुंडेंचा मोठा आधार गेला. त्यामुळे पक्षांतर्गत विरोधकांनी उचल खाल्ली आणि मुंडे यांचे महत्व कमी करण्याचे षडयंत्र सुरू झाले. या प्रकारामागे कोणाचा हात आहे, यासंबंधीच्या कथाही सांगितल्या जाऊ लागल्या. या सर्व प्रकारामागे गडकरीच आहेत असा गैरसमज झाला आणि तेंव्हापासून गडकरी यांचे मुंडे यांच्यासंबंधी कार्यक्रमात येणे बंद झाले.
Nitin Gadkari : …म्हणून मी मुंडेंच्या पाया पडलो होतो; गडकरींनी नाशिकमध्ये जागवल्या आठवणी
पंकजा मुंडे यांनी नाशिक जिल्ह्यातील कार्यक्रमात त्यांना निमंत्रण दिले आणि गडकरी ही आले. या कार्यक्रमात त्यांनी केलेल्या भाषणात त्यांनी गोपीनाथ मुंडे यांचे मोठेपण तर सांगितलेच पण त्यांच्या नेतृत्वाखाली आपण कसे काम केले हेही सांगितले. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद मिळाल्यानंतर इंदोर येथील कार्यक्रमात आपण गोपीनाथ मुंडे यांचे चरणस्पर्श करून दर्शन घेतले.
मुंडे यांनी विचारल्यानंतर मी त्यांना सांगितले की साहेब मी कितीही मोठा झालो तरी तुम्हीच माझे नेते आहात. याशिवाय त्यांनी मुंडे यांच्याबरोबर काम करत असतानाच्या अनेक आठवणी सांगितल्या. ते केवळ एका समाजाचे नव्हे तर सर्व समाजाचे नेते होते. पंकजा मुंडेंनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. परंतु गडकरींबाबत असलेले गैरसमज दूर होण्यास नक्कीच मदत होईल.
(अशोक देशमुख हे ज्येष्ठ पत्रकार आहेत.)