Download App

भाजप-मनसेचे वाद टोकाला : टोल नाक्यावरील तोडफोडीनंतर अमित ठाकरेंवरुन ‘ट्विटर वॉर’

मुंबई  : नाशिकजवळी सिन्नर येथील टोल नाका तोडफोडीनंतर मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) भाजपच्या निशाण्यावर आले आहेत. हे सरकार जनमान्यांचं सरकार आहे. इथे कोणा एका नेत्याच्या मुलासाठी वेगळे नियम नसतील. अमित ठाकरे टोल नाका फोडणे म्हणजे राजकारण नाही. कधीतरी बांधायलाही शिका आणि शिकवा, असा टोला भाजपने लगावला होता. त्यावर आता मनसे आमदार राजू पाटील यांनी भाजप आणि टोल नाक्यांच्या संबंधांचा भांडाफोड करायला लावू नका असा इशारा दिला आहे. त्यामुळे टोल नाक्यावरील राड्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये ट्विटर वॉर सुरु झालं आहे. (MNS MLA Raju Patil reply to bjp and bjp leader on Amit Thackeray criticize)

भाजप-मनसे आमने सामने :

भाजपने एक व्हिडीओ शेअर करत अमित ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. फास्टटॅगची तांत्रिक अडचण असल्याने साडे तीन मिनिटं गाडी थांबवून ठेवली होती. त्याला 10 मिनिटे म्हणत तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना टोल नाका फोडण्यासाठी भाग पाडलतं. पण हे जनसामान्यांचं सरकार आहे. इथे कोणा एका नेत्याच्या मुलासाठी वेगळे नियम नसतील. अमित ठाकरे टोल नाका फोडणे म्हणजे राजकारण नाही. कधीतरी बांधायलाही शिका आणि शिकवा, असा टोला भाजपने लगावला आहे.

यावर FASTGO INFRA PRIVATE LIMITED चे पार्टनर कोण आहेत? ती कंपनी कधी स्थापन झाली? त्या कंपनीतील भागीदारांचे कोणाशी संबंध आहेत? त्या कंपनीचा या क्षेत्रात अनुभव काय? ही कंपनी काही राजकारण्यांची shell company आहे का? या कंपनीला दिलेला ठेका हा operation lotus अंतर्गत दिलेली लाच आहे का? तसेच यातील भागीदारांचे फोटो कोणासोबत आहेत ते तपासा, याची उत्तरे शोधा. त्यामुळे अंधभक्तांनी व गद्दारांच्या बांडगुळांनी जपुन प्रतिक्रिया द्याव्यात, नाहीतर उगीचच तुम्हा बापड्यांच्या अज्ञानामुळे तुमचे मालक/चालक अडचणीत येतील. या टोलच्या ठेक्याचे ‘भांडे फोडण्याची’ वेळ आणू नका!असा इशारा मनसे आमदार राजू पाटील यांनी दिला आहे.

याशिवाय मनसेनेही यावरुन भाजप आणि सत्ताधारी पक्षांना प्रत्युत्तर दिलं आहे. कायदा-सुव्यवस्थेची इतकी काळजी असेल तर महाराष्ट्रातल्या मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण का वाढतंय? मुलींवर दिवसाढवळ्या कोयत्याने का वार होत आहेत ? बस अपघातांमध्ये आपली माणसं दगावतात आणि एकीकडे त्यांचा अंत्यसंस्कार सुरु असताना पक्ष फोडून मंत्र्यांचे शपथविधी कसे घेतले जातात? माणसं किड्या-मुंग्यांसारखी मरत आहेत आणि त्याचं सोयरंसुतक नसणारे निरंकुश सत्ताधीश पक्ष फोडण्यात मश्गुल आहेत, असा आरोप मनसेने केला आहे.

मनसेने फोडला टोल नाका :

नसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे यांची गाडी अडविल्याचा दावा करत संतप्त मनसैनिकांनी टोल नाका फोडला. रात्री अडीच वाजता समृद्धी महामर्गावरील सिन्नर तालुक्यातील गोंदे फाटा टोल नाक्यावर मनसैनिकांचे खळ्ळखट्याक पाहायला मिळाले. या तोडफोडीत टोल नाक्याचे मोठे नुकसान झाले आहे. अद्याप या प्रकरणी पोलिसांकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याची माहिती आहे. दरम्यान, पुन्हा असे झाल्यास पुन्हा तोडफोड करु असा इशाराही समर्थकांनी दिला असल्याची माहिती आहे.

Tags

follow us