महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीच्या चर्चा असतानाच मागील काही दिवसांपासून विविध मुद्द्यांवरुन खटके उडाले होते. अशात काल (30 मे) भाजपचे प्रमुख नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल सव्वा तास खलबत झाली. अचानक झालेल्या या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली होती. दरम्यान, या भेटीत काय चर्चा झाल्या याबाबत स्वतः फडणवीस यांनी माहिती दिली. (Deputy Chief Minister Devendra Fadnavis met MNS chief Raj Thackeray at Shivtirtha residence)
माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, बऱ्याच दिवसांपासून आमचं ठरलं होतं, एक दिवस गप्पा मारायला बसू. त्याचा मुहूर्त काल लागला आणि आम्ही गप्पा मारल्या. या भेटीत राजकीय गप्पा झाल्या का? यावर बोलताना फडणवीस म्हणाले, राजकीय गोष्टी सोडून इतर विषयांवर गप्पा करायच्या असतात, असे सांगत त्यांनी नेमक्या कोणत्या विषयांवर चर्चा झाली याबाबतची माहिती देणं टाळलं.
🕚 10.57am | 30-05-2023 📍 Mumbai |स. १०:५७ वा. | ३०-०५-२०२३ 📍 मुंबई
LIVE | Media interaction https://t.co/nCA1oqkXzv— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 30, 2023
भाजपचे विविध बडे नेते आणि राज ठाकरे यांच्यातील मागील काही दिवसांपासून भेटीगाठी वाढल्या आहेत. यामुळे आगामी मुंबई महानगरपलिकेसह राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसे आणि भाजप-शिवसेना युती होणार असल्याच्या चर्चा होत्या. पण मागील काही दिवसांपासून राज ठाकरे आणि भाजपमध्ये काही मुद्द्यांवर खटकेही उडाले आहेत.
कर्नाटक निवडणुकीतील भाजपच्या पराभवानंतर राज ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला होता. त्यांच्या या टिकेला भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले होते. यावर पुन्हा राज ठाकरेंनी शेलार यांच्यावर टीका केली होती. मागील आठवड्यात रिझर्व्ह बँकेनं 2000 रुपयांची नोट चलनातू मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. यावर राज ठाकरे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता.
याशिवाय त्र्यंबकेश्वर मंदिर वादावर भाष्य करताना भाजपच्या भूमिकेला विरोध करताना वर्षानुवर्षे जी परंपरा सुरु आहे ती थांबविण्यात काही अर्थ नाही, असं त्यांनी म्हटलं होतं. या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झाली का असा प्रश्न आता विचारला जात आहे.