प्रदूषित शहरांमध्ये देशाची राजधानी दिल्लीचे ( Delhi ) नाव अधिक घेतले जाते. दिल्ली येथील हवा अधिक प्रदूषित असल्याचे बोलले जाते. परंतु आता मुंबईकरांसांठी ( Mumbai ) चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. मुंबई शहर हे प्रदुषणाच्या ( Pollution ) बाबतीत जगातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर असल्याचे एका अहवालात समोर आले आहे.
स्विस एअर ट्रॅकिंग इंडेक्स IQAir या संस्थेच्या अहवालानुसार मुंबई शहर हे जगातील सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर होते. 29 जानेवारी ते 8 फेब्रुवारी या एका आठवड्याच्या दरम्यान मुंबई शहर प्रदूषित शहरांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर होते. प्रदूषित शहरांच्या यादीत मुंबईने दिल्लीला देखील मागे टाकले आहे. 29 जानेवारी रोजी मुंबई शहर IQAir च्या रँकिंगमध्ये दहाव्या क्रमांकावर होते. तर 2 फेब्रुवारी व 8 फेब्रुवारी रोजी मुंबई शहर हे दुसऱ्या क्रमांकावर होते. तसेच 13 फेब्रुवारी रोजी मुंबई शहर सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीत तेराव्या क्रमांकावर होते.
सीपीसीबीच्या आकड्यांच्या अहवालानुसार मुंबई शहरातील नोव्हेंबर-जानेवारीमधील वातावरण हे गेल्या तीन वर्षातील थंडीच्या तुलनेत सर्वात खराब होते. याचे कारण वाहनांचा धूर, ट्रॅफिक जाम, रस्ते बांधणीची कामे ही कारणे असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे. या प्रदूषणामुळे शहरामध्ये श्वासोच्छश्वास घेण्यासाठी अनेकांना त्रास होत आहे. त्यामुळे अनेक जण आजारी पडत असल्याचे देखील समोर आले आहे.