मुंबई : कथित टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट अर्थात टीआरपी (TRP) घोटाळ्याप्रकरणी रिपब्लिक वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांना शिंदे सरकारने मोठा दिलासा दिला आहे. राज्य सरकारने हा खटलाच मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर दाखल खटला मागे घेण्याच्या परवानगीसाठी पोलिसांनी मंगळवारी कनिष्ठ न्यायालयात अर्ज केला आहे. या याचिकेवर न्यायालयात येत्या 28 डिसेंबरला सुनावणी होणार आहे. पोलिसांची ही मागणी न्यायालयाने मान्य केल्यास गोस्वामी यांच्याविरोधातील हे प्रकरण कायमचे निकाली निघणार आहे. (Mumbai police move court for withdrawal of fake TRP case in which Arnab Goswami is an accused)
रेटिंग एजन्सी ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च कौन्सिलने (BARC) हंसा रिसर्च ग्रुप मार्फत ऑक्टोबर 2020 मध्ये एक तक्रार दाखल केली होती. यात काही टीव्ही चॅनेल TRP च्या आकड्यांमध्ये हेराफेरी करत असल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर हा कथित घोटाळा उघडकीस आला होता. पुरवणी आरोपपत्रात, पोलिसांनी गोस्वामी यांचे नाव या प्रकरणात आरोपी म्हणून ठेवले होते. गोस्वामी यांनी सहआरोपी, बीएआरसीचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांच्या संगनमताने, टीआरपीमध्ये बेकायदेशीरपणे फेरफार केली असा दावा पोलिसांनी केला होता. यासाठी गोस्वामी आणि दासगुप्ता यांच्या व्हॉट्सअॅप चॅट्सला या महत्त्वपूर्ण पुरावा म्हणून नमूद केले होते.
या प्रकरणी गुन्हे शाखेने रिपब्लिक टीव्हीचे वितरण प्रमुख आणि अन्य दोन वाहिन्यांच्या मालकांसह 12 हून अधिक जणांना अटक केली होती. हे सर्व आरोपी जामिनावर बाहेर आहेत. यानंतर मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे, अंमलबजावणी संचालनालयानेही (ईडी) कथित टीआरपी हेराफेरी घोटाळ्यात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. मात्र ईडीने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये दाखल केलेल्या आरोपपत्रात या कथित घोटाळ्यात रिपब्लिक टीव्हीविरुद्ध कोणतेही पुरावे सापडले नाहीत, असा दावा केला होता. तसेच मुंबई पोलिसांचा तपास ईडीच्या तपासापेक्षा “वेगळा” होता, असेही स्पष्ट केले होते. पण आता राज्य सरकारने हा खटलाच मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
टीआरपी घोटाळ्यात नाव चर्चेत असतानाच अर्णब गोस्वामी यांना इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांच्या आईच्या आत्महत्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. नाईक यांनी रिपब्लिक टीव्ही चॅनेलचे स्टुडिओचे इंटेरियर डिझाईनिंगचे काम केले होते. या कामापोटीच्या बिलाचे पाच कोटी, 40 लाख रुपये येणे होते. वारंवार मागणी करुनही हे पैसे मिळत नसल्याने नाईक यांनी अलिबागजवळील कावीर गावात आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी नाईक यांनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवल्यामुळे आत्महत्या केल्याचे म्हंटले होते. त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक झाली होती.
अर्णब गोस्वामी आणि त्यांच्या रिपब्लिक टीव्हीला केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे पुरस्कर्ते मानले जाते. यातूनच त्यांनी शिवसेनेचे तत्कालिन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर कडवी टीका केली होती. याच टीकेनंतर लगेचच गोस्वामी यांच्यावर अटकेची कारवाई झाली होती. त्यामुळे या दोन्ही घटनांचा एकमेकांशी संबंध जोडला गेला होता. त्यानंतर न्यायालयाने गोस्वामी यांना या प्रकरणात जामीन मंजूर केला होता.