Sanjay Raut : ‘आता एकनाथ शिंदेंवरच गुन्हा दाखल करा’; दळवींच्या अटकेवर राऊत भडकले

Sanjay Raut : ‘आता एकनाथ शिंदेंवरच गुन्हा दाखल करा’; दळवींच्या अटकेवर राऊत भडकले

Sanjay Raut : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना (Eknath Shinde) जाहीर सभेत शिवीगाळ केल्यामुळे ठाकरे गटातील माजी महापौर दत्ता दळवी यांना भांडुप पोलिसांनी अटक केली. पोलिसांच्या या कारवाईनंतर शिंदे आणि ठाकरे गटातील वाद पुन्हा उफाळून आला आहे. भांडुप पोलीस स्टेशनसमोरच हायहोल्टेज ड्रामा झाला. खासदार संजय राऊत ( Sanjay Raut)यांनी येथे येत या प्रकरणाची माहिती घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सीएम शिंदेंवर तुफान हल्ला चढवला.  राऊत म्हणाले, मी आत्ता भांडुप पोलीस स्टेशनला उभा आहे. मुंबईचे माजी महापौर शिवसेनेचे उपनेते आमचे सहकारी दत्ता दळवी यांना आज सकाळी पोलिसांनी घरात घुसून अटक केली. एखाद्या 302, 307 कलम लागलेल्या खुनाच्या किंवा खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक करावी तशी अटक केली. दत्ता दळवींचा गुन्हा काय? त्यांनी राज्याच्या जनतेच्या लोकभावना मेळाव्यात व्यक्त केल्या. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी किंवा त्यांच्याबरोबरचे गद्दार हृदयसम्राट स्वतःला हिंदू हृदयसम्राट म्हणवून घेत आहेत. खरंतर एकनाथ शिंदे यांच्यावरच गुन्हा दाखल व्हायला हवा, अशी मागणी राऊत यांनी केली.

Sanjay Raut :तुमच्यासारखी माणसं सरकारच्या ताटाखालचं मांजर.. राऊतांचा नार्वेकरांवर हल्लाबोल

दत्ता दळवी यांनी जे वक्तव्य केलं. त्यात काहीही चूक नाही. धर्मवीर चित्रपटात आनंद दिघे यांच्या तोंडी तो शब्द आहे. तिथं सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला नाही मग दळवी यांच्या वक्तव्यावर आक्षेप का?, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. शिंदे गट हे सगंळ मुद्दाम करत आहे. पण त्यांनी एक लक्षात ठेवावं की निवडणुकीत त्यांची हार पक्की आहे असा इशारा राऊत यांनी दिला.

एकनाथ शिंदेंवरच गुन्हा दाखल करा

आरोपी कुठे तरी पळून जाणार अशा पद्धतीने पोलिसांनी दळवींना अटक केली. गद्दार हृदयसम्राट स्वतःला हिंदुहृदयसम्राट समजून घेत आहेत. एकनाथ शिंदे यांच्यावरच गुन्हा दाखल व्हायला हवा. कारण ते स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांची उपाधी लावून घेत आहेत. जर आनंद दिघे आज असते तर त्यांनी चाबकाचे फटके मारले असते असे संजय राऊत म्हणाले.

Eknath Shinde : ‘मुंब्र्यात फुसके बार आले पण, वाजलेच नाही’ CM शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला

निर्माते, कलाकारांवर गुन्हा का नाही ?

धर्मवीर आनंद दिघे यांच्या तोंडी तो शब्द आहे. चित्रपटातील शब्द सेन्सॉर बोर्डानेही कापला नाही. जर तो आक्षेपार्ह असेल तर चित्रपट निर्माते, कलाकार यांच्यावर गुन्हा दाखल का केला नाही. नारायण तातू राणे, अब्दुल सत्तार यांनी सभेत शिवीगाळ केली त्यांना अटक नाही, गुन्हा नाह. पण, दत्ता दळवी यांनी लोकभावना व्यक्त केली त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून गद्दार हृदयसम्राट मुख्यमंत्री आणि दोन उपमु्ख्यमंत्री जे प्रचाराला फिरत आहेत त्यावरून लक्ष विचलित करण्याचा हा प्रकार आहे असा आरोप राऊत यांनी यावेळी केला. दत्ता दळवी यांच्या विधानाचे आम्ही जाहीर समर्थन करतो असेही राऊतांनी स्पष्ट केले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube