Download App

नाराजी उफाळली, काँग्रेसमध्ये भूकंप; नवी मुंबईत ‘या’ नेत्याने पक्षाला दिली सोडचिठ्ठी

नवी मुंबईत काँग्रेस पक्षात राजकीय भूकंप झाला आहे. ज्येष्ठ नेते रमाकांत म्हात्रे यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे.

Maharashtra Politics : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं पानिपत झालं. ठाकरे गटाला मोठा झटका बसला. तर दुसरीकडे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला गळती लागली. काँग्रेसलाही धक्के बसू लागले आहेत. नवी मुंबईत काँग्रेस पक्षात राजकीय भूकंप झाला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महापौर रमाकांत म्हात्रे यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. यानंतर त्यांच्या पत्नी मंदाकिनी म्हात्रे, त्यांचा मुलगा आणि युवक काँग्रेसचे नवी मुंबईचे अध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांनी आपापल्या पदांचा राजीनामा दिला आहे.

ठाकरेंना धक्का! अहिल्यानगरचे पदाधिकारी करणार जय महाराष्ट्र; मुहूर्तही ठरला

विधानसभा निवडणुकीत ऐरोली मतदारसंघातून उमेदवारीची तयारी अनिकेत म्हात्रे यांनी केली होती. मात्र त्यांना तिकीट मिळालं नाही. यानंतर ते नाराज असल्याची चर्चा होती. या मतदारसंघात म्हात्रे कुटुंबाचा दबदबा आहे तरी देखील पक्षाने त्यांचा विचार केला नाही. याच काळात नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

त्यांच्या राजीनाम्यानंतर जिल्हाध्यक्षपद रिक्त झालं होतं. आता हे पद तरी आपल्याला मिळावं अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र यावेळी पक्ष नेतृत्वाने त्यांचा विचार केला नाही. त्याऐवजी अरविंद नाईक यांना जिल्हाध्यक्ष केलं. पक्ष नेतृ्त्वाची ही खेळी म्हात्रे कुटुंबियांच्या जिव्हारी लागणारी होती. त्यांच्यातील नाराजी आणखीनच वाढली. या नाराजीतूनच ज्येष्ठ नेते रमाकांत म्हात्रे यांनी पक्षातील पदांचा राजीनामा दिला. त्यांच्यानंतर त्यांच्या पत्नी मंदाकिनी म्हात्रे आणि अनिकेत म्हात्रे यांनी देखील पक्षातील पदाचा राजीनामा दिला आहे. म्हात्रे कुटुंबियांच्या या निर्णयानंतर नवी मुंबईत काँग्रेसचे अस्तित्व राहणार का, यानंतर म्हात्रे कुटुंबीय कोणता राजकीय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महिलांना दरमहा अडीच हजार, 500 रुपयांत सिलिंडर; काँग्रेसने पाडला आश्वासनांचा पाऊस 

मुंबईत ठाकरेंना धक्का

वर्सोवा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या तथा माजी नगरसेविका राजुल पटेल यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र केला आहे. सोमवारी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या (Eknath Shinde) उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. या घडामोडीने ठाकरे गटाला महापालिका निवडणुकीआधी मोठा धक्का बसला आहे. मुंबईत पक्षाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

राजुल पटेल यांनी पक्ष सोडण्यामागे कारण आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीत वर्सोवा मतदारसंघातून तिकीट मागितले होते. मात्र त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. तेव्हापासून त्या नाराज असल्याची चर्चा होती. मी 40 वर्षे पक्षात काम केलं. या काळात पक्षान मला न्याय देखील दिला. परंतु, पक्षात असेही काही असतात ज्यांना आपल्यामुळे काही अडचणी असतात. आता अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी मी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे असे राजुल पटेल पक्ष प्रवेशावेळी म्हणाल्या.

follow us