Download App

Sharad Pawar & Eknath Shinde : शरद पवार आणि एकनाथ शिंदे आज एकाच मंचावर

पुणे : पुण्यातील (Pune) मांजरी या ठिकाणी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 46 वी सर्वसाधारण सभा आज पार पडणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज एकाच मंचावर एकत्र येणार आहेत. दरवर्षी या संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित ही सभा पार पडत असते.

मांजरी येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 46 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज शनिवारी रोजी सकाळी 11 वाजता पार पडणार आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने साखर उद्योगातील सर्वोत्कृष्ट कार्यक्षमतेसाठी दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरणही यावेळी करण्यात येणार आहेत.

या कार्यक्रमानिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. राज्यातील बंडानंतर राज्यात शिंदे – फडणवीस सरकार आले. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीत दोघे नेते एकत्र येणार असल्याने ते काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या कार्यक्रमाला राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील यांचीही उपस्थिती असणार आहे. त्यांच्यासह विश्वस्त आणि नियामक मंडळाचे सदस्य, अधिकारी, आणि राज्याच्या साखर उद्योगातील अन्य नेते देखील हजेरी लावणार आहेत. यावेळी इन्स्टिट्यूटतर्फे 2021-2022 या वर्षासाठी विविध पुरस्कारांचं वितरण केलं जाणार आहे.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पूर्वाश्रमीची डेक्कन शुगर इन्स्टिट्यूट ही महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांनी एकत्र येऊन साखर उद्योगाशी निगडीत शास्त्रीय, तांत्रिक आणि शैक्षणिक संशोधन करण्याकरिता या संस्थेची स्थापना केली. या संस्थेची स्थापना 19 नोव्हेंबर 1975 रोजी दिवंगत वसंतदादा पाटील यांनी केली आहे. 1956-57 मध्येच त्यांनी शेतकरी सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली होती.

Tags

follow us