मुंबई : राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयस्तरावर (International Games) लक्षवेधी कामगिरी केलेल्या महाराष्ट्रातल्या खेळाडूंची सरकारकडून अवहेलना होत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला आहे. सहा महिने झाले सरकारने बक्षिसांची नुसतीच घोषणा केली आहे. सरकारने खेळाडूंचा गौरवही केला नाही आणि पुरस्काराची रक्कमसुध्दा दिली नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.
अजित पवार म्हणाले, महाराष्ट्रातल्या खेळाडूंनी गेल्यावर्षी विविध खेळात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयस्तरावर (Khelo India) लक्षवेधी कामगिरी केली आहे. या खेळाडूंना रोख रकमेची घोषणा राज्य सरकारच्यावतीने करण्यात आली होती. मात्र या घोषणेला सहा महिने उलटून गेले तरी विजेत्या खेळाडूंना ना घोषीत करण्यात आलेली रक्कम मिळाली, ना त्यांचा गौरव करण्यात आला. राज्यसरकार राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयस्तरावर महाराष्ट्राची मान उंचावणाऱ्या खेळाडूंची अवहेलना करत असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला.
काय मांडायचंय ते मांडा पण.., अजितदादा भुसेंवर का चिडले?
दरम्यान या विजेत्या खेळाडूंना घोषित केलेली रक्कम तसेच त्यांचा उचित गौरव करण्याची मागणीही अजित पवार यांनी सभागृहात केली. महाराष्ट्रातल्या खेळाडूंनी गेल्यावर्षी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयस्तरावर विविध खेळात चमकदार कामगिरी केली आहे. गेल्या वर्षभरात विविध खेळाडूंनी २८६ पदकांची लयलूट केली आहे. तसेच यावर्षीच्या खेलो इंडिया (Khelo India) स्पर्धेत सुध्दा महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत देशात सर्वाधिक पदके पटकावली आहेत. गेल्या वर्षभरात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयस्तरावर चकमदार कामगिरी केलेल्या खेळाडूंना रोख रक्कम देण्याची घोषणा राज्यसरकारने केली होती याची आठवणही अजित पवार यांनी करुन दिली.