मुंबई : भाजप नेते अशिष शेलार (Ashish Shelar) यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या नावाने दिला जाणारा पहिला पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला म्हणून संगीत विद्यालयाची परवानगी रद्द केली होती, अशी माहिती अशिष शेलार यांनी दिली आहे.
आमदार शेलार म्हणाले, लता मंगेशकर यांच्या निधनानंतर तत्कालीन आघाडी सरकारने त्यांच्या नावाने महाराष्ट्रात संगीत विद्यालय सुरू करण्यात येईल अशी घोषणा केली. या विद्यालयाची परवानगीची फाईल त्यावेळी तयार झाली आणि ती तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आली होती. मात्र दरम्यानच्या काळात मंगेशकर कुटुंबीयांनी स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या नावाने दिला जाणारा पहिला पुरस्कार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला.
निवडणूक आयोगाला शिव्याच घातल्या पाहिजे, राऊतानंतर अंबादास दानवेही
हा पुरस्कार नरेंद्र मोदी यांना दिला म्हणून तसेच या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांना बोलावले नाही म्हणून मुख्यमंत्र्यांनी संगीत विद्यालयाची परवानगी रद्द केली होती. त्यानंतर सुदैवाने सरकार बदलले मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान झाले आणि पुन्हा त्या संगीत विद्यालयाला परवानगी देण्यात आली, असा आरोप आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.
दरम्यान, संगीत विद्यालय सुरू केल्याबद्दल शिंदे फडणवीस सरकारचे आभार मानतानाच आमदार शेलार यांनी आता या विद्यालयाला विद्यापीठाची मान्यता देण्यात यावी, तसेच येथे संगीत लायब्ररी सुरू करण्यात यावी, आंतरराष्ट्रीय दर्जाची वाद्य येथे उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.