Download App

अवघ्या २० दिवसांत PM Modi चा दुसरा मुंबई दौरा? BMC जिंकण्यासाठी भाजपने कंबर कसली?

  • Written By: Last Updated:

मुंबई : १९ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमधील मेट्रोसह विविध प्रकल्पांच्या भूमिपूजन आणि उद्घाटनांसाठी आले होते, त्यानंतर अवघ्या २० दिवसांतच पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत. येत्या १० फेब्रुवारीला मोदींचा मुंबई दौरा नियोजित करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २० दिवसातल्या दुसऱ्या दौऱ्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकांची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्भव ठाकरे यांच्या ताब्यात असलेली मुंबई महापालिका जिंकण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. मोदी यांनी आपल्या मागच्या दौऱ्यात तसे सुतोवाचही केले होते.

मोदींच्या मुंबई दौऱ्यात काय होणार?

मुंबईतल्या बोहरा मुस्लिम समाजाचा एक कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला नरेंद्र मोदी उपस्थिती लावण्याची शक्यता आहे. याशिवाय या कार्यक्रमात एका रुग्णालयाचं लोकार्पणही मोदींच्या हस्ते होण्याची शक्यता आहे.

यशिवाय नरेंद्र मोदी या मुंबई दौऱ्यामध्ये मुंबई सीएसएमटी-सोलापूर आणि सीएसएमटी-शिर्डी या दोन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्याची शक्यता आहे. यानंतर राज्यांतर्गत दोन वंदे भारत एक्सप्रेस असणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असेल. याआधी मुंबई सेंट्रल ते गांधीनगर अशी धावणारी तिसरी वंदे भारत एक्स्प्रेस असेल.

वंदे भारत एक्स्प्रेसमुळे मुंबई ते सोलापूर हा प्रवास केवळ साडे सहा तासांमध्ये पूर्ण करता येणार आहे. सध्या सिद्धेश्वर एक्स्प्रेसला मुंबई ते सोलापूर अंतर कापण्यासाठी आठ तास लागतात. तसेच सीएसएमटी-साई नगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेसमधूनही पाच तास ५५ मिनिटांचा प्रवास होणार आहे.

 

Tags

follow us