मुंबई : भावांसोबत मिळून मुंबईमधील दोन एकर जमिनीचा अपहार केल्याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे. अबिदा जफर स्माइली असे या महिलेचे नाव असून तिला म्हैसूर (कर्नाटक) येथील एका हॉटेलमधून त्याला अटक केली आहे. तिने अपहार केलेल्या जमिनीची अंदाजे किंमत 100 कोटींच्या घरात आहे. तिला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली असून सध्या तिची चौकशी सुरु आहे. (police arrested a woman for embezzling two acres of land in Mumbai along with her brothers)
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, मुंबईतील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या लोअर परळ भागातील डिलाईल रोड परिसरात दोन एकर जमीन आहे. अबिदा जफर स्माइली हिचा भाऊ लतीफ कपाडिया आणि दिवंगत काका जफर कपाडिया यांच्या नावावर सामाईकपणे ही जमीन होती. जफर कपाडिया यांच्या निधनानंतर वारसा हक्काने ही जागा त्यांच्या मुलांच्या नावावर झाली होती.
तपासातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “लतीफ, अजीज, रहीम, मलिक आणि अमिना, आबिदा असे चार भाऊ आणि दोन बहिणी आहेत. तर दिवंगत जफर कपाडिया यांना फरजाना, रुखशाना, रेहाना, अमीन, अनवर, महजबीन आणि अयाज असे तीन मुले, तीन मुली असा परिवार आहे.
यातील अमिना, रहीम आणि मलिक यांना पैशांची गरज असल्याने अबिदाने लतीफला हाताशी धरुन जमीन परस्पर विकण्याचा निर्णय घेतला. अमिना यांच्याकडे मालमत्तेची पॉवर ऑफ अॅटर्नी होती, याचा उपयोग करत या सर्वांनी मिळून कट रचला. त्यांनी डेव्हरपसोबत कागदपत्रांवर सह्या केल्या, त्याबदल्यात डेव्हलपरने त्यांना साडे तीन कोटी रुपये दिले. याशिवाय संबंधित जमिनीवर उभारण्यात येणाऱ्या हायराईजमध्ये दोन फ्लॅट देण्याचा करारही करण्यात आला.
मात्र जफर कपाडिया यांचा मुलगा अयाज याला नुकतेच लतीफ आणि त्याच्या कुटुंबियांनी त्यांच्या नकळत जुन्या सीमाशुल्क कार्यालयाच्या संयुक्त उपनिबंधकांच्या कार्यालयात जमीन मालकीची बनावट कागदपत्रे तयार केली आहेत आणि जमीन बिग ट्री डेव्हलपर्सना विकली असल्याचे कळाले. यानंतर याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली, त्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला.