Download App

Letsupp Special: उद्या नरेंद्र मोदींची मुंबईत जाहीर सभा, महापालिकेचा बिगुल वाजणार?

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) एक दिवसाच्या मुंबई (Mumbai) दौऱ्यावर येत आहेत. मुंबई महापालिकेच्या (BMC) विकासकामांचे भूमिपूजन आणि मेट्रो तसेच आरोग्य सेवांचे लोकार्पण करणार आहेत.

त्यानंतर नरेंद्र मोदींची जाहीर सभा होणार आहे. मोदींची या जाहीर सभेने महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजवणार हे नक्की.

राज्यातील मुंबईसह १५ महापालिकांची पंचवार्षिक मुदत संपली आहे. या निवडणुका कधी होतील याबाबत निवडणूक आयोगाकडून कुठलेही स्पष्ट संकेत मिळाले नाही.

मात्र गेल्या महिनाभरात मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पिंपरी-चिंचवड, पुणे, नाशिक, कोल्हापूर, वसई-विरार, औरंगाबाद, नवी मुंबई, सोलापूर, अकोला, नागपूर, चंद्रपूर आणि परभणी या महापालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहेत.

यातील मुंबई आणि ठाणे जिल्हा, पुणे, नाशिक आणि औरंगाबाद तसेच नागपूर या भागावर भाजपाने लक्ष केंद्रीत केले आहे. कारण राज्यातल्या एकूण विधानसभा आणि लोकसभेच्या निम्या जागा या पट्यात येतात.

मुंबई महापालिकेत मुख्यमंत्र्यांनी केलेली ५०० कामांची सुरुवात, कल्याण-डोंबिवली आणि ठाण्यासाठी २० हजार कोटीची विकासकामे, नाशिकमध्ये शिवसेना नगरसेवक फोडणे, औरंगाबाद शहराचा नामांतर वाद, नागपुरातील विकास कामांच्या उद्घाटनासाठी महापालिकेमध्ये दौऱ्यांचा सपाटा पाहता. राज्यात लवकरच महापालिका निवडणुकीची घोषणा होईल असेच संकेत मिळत आहेत.

मुंबई महापालिकेवर भाजपचे लक्ष
पंतप्रधान मोदी यांच्या मुंबई दौऱ्यात मेट्रो मार्गिका, आरोग्य आपला दवाखाना यांचं लोकार्पण, त्याच बरोबर इतर विकास कामांचे भूमिपूजन ज्या भागात होत आहेत. हा भाग बहुतांश हिंदी भाषिक आहेत.

म्हणजेच वरळी, वांद्रे अंधेरी, घाटकोपर, मालाड, दहिसर, बोरिवली, गोरेगाव हा संपूर्ण पश्चिम उपनगराचा भाग आहे. या भागात मुंबई महापालिकेच्या एकूण २२७ जागांपैकी निम्या जागा या भागात येतात. भाजपाच्या सर्वाधिक जागा देखील याच पट्यात निवडून आल्या आहेत.

महापालिका निवडणुकीसाठी भाजपने संपूर्ण हिंदी आणि गुजराती भाषिकांवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्याच बरोबर आज नवी योजना राबवण्यात येणार आहे. फुटपाथावरील फेरीवाला हा देखील भाजपाचा मोठा मतदार आहे.

भाजपची हिंदी भाषकांवर संपूर्ण मदार राहणार आहे. या भागातून अधिकाधिक नगरसेवक निवडून आल्यास, उर्वरित ज्या मराठी भागात शिवसेना आहे त्या भागात शिवसेनेचा सामना करण्यासाठी मनसे आणि शिंदे गट मराठी मतांची मतविभागणी करेल असा एक कयास आहे.

महापालिकेच्या निवडणुका या मार्च-एप्रिल पर्यंत होतील अशी शक्यता आहे. तोपर्यंत नरेंद्र मोदी यांचे किमान तीन दौरे मुंबईत अपेक्षित आहेत.

उद्या कार्यक्रमानंतर होणाऱ्या जाहीर सभेची तयारी भाजपने निवडणुकीच्या प्रचार सभेप्रमाणे केली आहे. भाजपचे बॅनर, झेंडे, नरेंद्र मोदी यांचे कट आऊट या सर्व बाबी पाहता ही निवडणुकीची तयारी आहे का? असंच चित्र आहे.

प्रफुल्ल साळुंखे
विशेष प्रतिनिधी

Tags

follow us