Download App

‘टोल’ राज्यातील मोठा घोटाळा, शहानिशा करा!’; व्हिडिओ दाखवत राज ठाकरेंनी केली पोलखोल

Raj Thackeray : मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी काल टोलदरवाढीविरोधात उपोषण मागे घेतल्यानंतर आज मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. टोलचा पैसा नेमका जातो कुठे, त्याच त्याच लोकांना कंत्राट कसे मिळते असे सवाल विचारत राज ठाकरे यांनी राज्यातील सत्ताधारी नेत्यांचे टोल संदर्भातील जुने सात व्हिडिओ दाखवले. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काही क्लिप दाखवल्या.

.. तर टोलनाकाच जाळून टाकू

उपमु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांन राज्यात टोलबंदी असल्याचे वक्तव्य केले होते. हाच व्हिडिओ दाखवत त्यांनी फडणवीस धादांत खोटं बोलत असल्याचा आरोप केला. यापुढे जर टोलनाक्यावर अडवलं तर टोल जाळून टाकू, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला. टोलचा पैसा नेमका जातो कुठे, त्याच त्याच कंपन्यांना टोलची कंत्राटं कशी मिळतात असे प्रश्न उपस्थित करत नेते फक्त आपल्याला लुबाडतात, हे लोकांना कळत नाही का. टोलवसुली हा मोठा घोटाळा आहे, राज्यातील या स्कॅमची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली.

Chhagan Bhujbal : ‘चौकशी कसली करता मला माहित नाही’; दमानियांच्या आरोपांवर भुजबळांच स्पष्ट उत्तर

टोलचा पैसा जातो कुठे?, त्याच त्याच कंपन्यांना टोल कसे मिळतात?

आपलं टोलचं आंदोलन 2009-10 च्या सुमारास सुरू झालं. हा सगळा टोलचा कॅशमधला पैसा जातो कुठे?, याच होतं काय? आणि त्याच त्याच कंपन्यांना हे टोल मिळतात कसे? असे सवाल राज ठाकरे यांनी केले. यानंतरही जर शहरातील रस्त्यांवर खड्डे पडणार असतील तर हे पैसे जातात कुठे, असा प्रश्न पडतो असे राज ठाकरे म्हणाले. यानंतर त्यांनी राज्यातील नेत्यांच्या वक्तव्यांचे व्हिडिओ दाखवले. यानंतर ठाकरे म्हणाले, ही माणसं प्रत्येकवेळी टोल मुक्तीची घोषणा करतात. या सगळ्याच नेत्यांची राज्यात सरकारं होती तरी देखील टोलमुक्ती झाली नाही. राजकारणातील अनेक लोकांच्या उदरनिर्वाहाचं हे साधन आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

आता आम्हीच हिशोब तपासणार

अनेकांना टोलवसुसलीतून दर दिवसाला, दर आठवड्याला, दर महिन्याला पैसे मिळतात. त्यामुळे हे नेते कधीही चांगले रस्ते होऊ देणार नाहीत. प्रत्येक टोलनाक्यावर किती टोल वसुली होत आहे. कधीपर्यंत टोल वसूल केला जाणार आहे याचा हिशोब झालाच पाहिजे. फडणवीसांच्या म्हणण्यानुसार दुचाकी, तीनचाकी, खासगी चारचाकी वाहनांकडून टोल वसूल केला नाही ना, याची खातरजम आता आम्हीच करणार आहोत. आमची माणसं प्रत्येक टोलनाक्यावर उभी राहतील व या वाहनांना टोल भरू दिला जाणार नाही. यावेळी आम्हाला कुणी विरोध केला तर तो टोलनाका आम्ही जाळून टाकू, पुढं सरकारला काय करायचे ते करा, असा रोखठोक इशारा राज ठाकरे यांनी दिला.

”…मग समोर बसलेले शरद पवार काय मेणाचा पुतळा होते का?”

Tags

follow us