मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या शेवटच्या भेटी विषयीचा एक भावनिक व्हिडीओ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून शेअर करत बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण केली.
“जा लढ, मी आहे… काही मूक संवादांमध्ये प्रचंड अर्थ दडलेले असतात, राज ठाकरे यांचा बाळासाहेब ठाकरे यांच्याशी अखेरचा ‘राज’कीय संवाद !” असं मनसेने ट्वीट केलं आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ट्वीट करण्यात आलेल्या व्हीडिओमध्ये राज ठाकरे म्हणताना दिसतात की, “मला आजही ती गोष्ट आठवते की जेव्हा बाळासाहेबांना कळलं, की हा काही राहत नाही पक्षात आता. माझी शेवटची भेट होती. मी आपर्यंत कधी बोललो नाही तुम्हाला ही गोष्ट पण निघताना माझ्याबरोबर तेव्हा मनोहर जोशी होते, मनोहर जोशी रूमच्या बाहेर गेले आणि ते रूमच्या बाहेर गेल्यावर मला बाळासाहेबांनी बोलावलं, माझ्यासमोर हात पसरले आणि मला मिठी मारली आणि म्हणाले आता जा. त्यांना समजलं होतं.”
याचबरोबर, “जेव्हा मुलाखतकाराने मला विचारलं की भुजबळांचं बंड, नारायण राणेंचं बंड, शिंदेंचं बंडं आणि तुमचं बंड म्हटलं माझं बंड लावू नका त्यात. हे सगळेजण गेले हे एका पक्षात गेले आणि सत्तेत गेले. या तुमच्या राज ठाकरेने बाळासाहेब ठाकरे यांना भेटून त्यांना सांगून मी बाहेर पडलेलो आहे. त्यामुळे मी दगाफटका करून, गद्दारी करून, पाठीत खंजीर खुपसून असा नाही बाहेर पडलेलो आणि बाहेर पडून दुसऱ्या कुठल्याही पक्षात गेलो नाही. तुमच्या विश्वासावर पक्ष उभा केला.” असंही राज ठाकरे म्हणले आहेत.”
दरम्यान सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून ते राजकीय नेते मंडळींकडून बाळासाहेबांना आदरांजली अर्पण केली जात आहे. तसेच ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दोन्ही गटांकडून बाळासाहेबांची जयंती साजरी केली जाणार आहे.