मुंबई : अर्थसंकल्पात घोषणा फार असतात. एवढीच अपेक्षा आहे की, दोन-पाच उद्योगपतींना, कॉर्पोरेट विश्वाला समोर ठेवून हा अर्थसंकल्प (budget) मांडला जाऊ नये. या देशामध्ये शेतकरी, बेरोजगार, कष्टकरी, मजूर आहेत. ते आज देखील न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. त्यांना डोळ्यांसमोर ठेवून हा अर्थसंकल्प सादर करण्यात आलं, तर त्याचं स्वागत केले जाईल. नाहीतर दोनजण खरेदी करतात, दोनजण विकतात असं जे राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणतात, फक्त दोघांसाठी देशाची अर्थव्यवस्था राबवली जात असते, यामुळे हा देश आर्थिकदृष्ट्या खड्ड्यात जाणार आहे. ती सध्या जातच आहे, अशी टीका संजय राऊतांनी (Sanjay Raut) मोदी सरकारवर (Modi government) केली.
संजय राऊतांच्या धमक्यांमुळे आम्ही शिवसेना (Shiv Sena) सोडली, असा दावा सतत शिंदे गटाकडून केला जात असतो, यावर संजय राऊतांनी खोचक शब्दांत टीका केली. बंड करून गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दंडुक्यांनी मारण्याची भाषा आपण केलीच नव्हती, असं राऊतांनी यावेळी सांगितलं. लाठ्या मारा किंवा त्यांना दंडुक्याने बडवून काढा असं भाषण मला वाटतं आज त्यांच्या गटात असणाऱ्या शीतल म्हात्रे यांनी अलिबागच्या सभेत केलं होतं. त्यांनी एकदा स्पष्ट केलं पाहिजे की ते का सोडून गेले ? मी धमक्या दिल्याने सोडून गेले की शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेसबरोबर युती केल्याने सोडून गेले की हिंदुत्वाच्या संदर्भात त्यांच्या भूमिका वेगळ्या होते, म्हणून ते सोडून गेले. त्यांनी एकदा स्पष्ट सांगितलं पाहिजे. ते प्रत्येक वेळा भूमिका बदलत असतात, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.
ते खोके मिळाल्याने सोडून गेले. हा धमकीचा विषय आत्ता आला. ते ज्या माझ्या भाषणाचा उल्लेख करत आहेत, ते भाषण मी हे लोक सुरतवरून गुवाहाटीला पोहोचल्यावर दहिसरला केलेलं होते. ते भाषण काळजीपूर्वक तुम्ही बघा. म्हणजे तुम्हाला कळेल त्यांना मी काय बोललोय ते. यांना आल्यावर दंडुक्यांनी बडवा, यांचा पार्श्वभाग सुजवा आल्यावर असं त्यांच्या प्रवक्या शीतल म्हात्रे यांनी शिवसेनेत असताना केलेलं भाष्य आहे. यानंतर त्या देखील गुवाहाटीला जाऊन त्यांना मिळाले. हे यांचं वैफल्य आहे. निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय अशी प्रत्येक लढाई ते हरणार आहेत, असं संजय राऊत यांनी यावेळी म्हणाले.