मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र आणि शिवसेना (Shivsena) खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्याविरोधात कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून वैशाली दरेकर (Vaishali Darekar) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय हातकणंगलेमधून माजी आमदार सत्यजीत पाटील, जळगावमधून करण पवार आणि पालघर मतदारसंघातून भारती कामडी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. (Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) candidate for Vaishali Darekar from Kalyan Lok Sabha Constituency)
भाजपमध्ये नाराज असलेले जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांनी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. त्यांच्यासोबत पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांनीही शिवबंधन बांधले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे यांनी या कल्याण, हातकणंगले, जळगाव आणि पालघरमधील उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. यावेळी मुंबईमधील चार जागा आपण लढणार असून दोन जागा काँग्रेसला सोडल्या आहेत, असेही ठाकरे यांनी सांगितले.
वैशाली दरेकर या मुळच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्या होत्या. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमधून त्यांची राजकीय कारकीर्द सुरु झाली. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये माजी विरोधी पक्षनेतेपदही त्यांनी भुषविले आहे. याशिवाय 2009 मध्ये त्यांनी मनसेकडूनच कल्याण लोकसभेची निवडणूक लढवली होती. यात त्यांना एक लाख मते मिळाली होती. मात्र 2015 मध्ये झालेल्या महानगरपालिकेमध्ये प्रभाग आरक्षण आणि पुनरर्चनेमुळे उमेदवारी मिळाली नव्हती. त्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांना पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्याची पूर्तना न झाल्याने नाराज झालेल्या दरेकर 2016 मध्ये महिला कार्यकर्त्यांसह शिवसेनेत डेरेदाखल झाल्या होत्या.
करण पवार हे माजी आमदार भास्करराव पाटील यांचे नातू आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार डॉ. सतीश पाटील यांचे पुतणे आहेत. याशिवाय उन्मेष पाटील यांचे निकटवर्तीय समजले जातात. गत नगरपालिका निवडणुकीत ते नगराध्यक्षपदी निवडून आले होते. आता ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांना जळगाव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.