Download App

आ. धसांना फडणवीसांचा धक्का, इनामी जमिनीचे चार महिन्यांत चौकशीचे आदेश

मुंबई : भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांना मोठा धक्का बसला आहे. इनामी जमिनीच्या (Temple land) गैरव्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक कारवाईचा इशारा दिला आहे. पुढील तीन ते चार महिन्यांत तपास करण्याचे आदेश देणार असल्याचे सभागृहात त्यांनी सांगितले. आमदार सुरेश धस आणि त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी इनामी जमिनी आपल्या मालकीच्या करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते राम खाडे आणि अॅड. असीम सरोदे यांनी उघड केले होते. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आमदार सुरेश धस यांची याचिका फेटाळल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सभागृहात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘बीड जिल्ह्यात देवस्थान जमिनी हडप करण्याचे मोठे रॅकेट आहे. यामध्ये हिंदू देवस्थान जमिन आणि वक्फ बोर्डाच्या जमिनीचे गैरव्यवहार झाले आहेत. या संदर्भात निश्चित कडक कारवाई केली जाईल. पोलीसांना पुढील तीन-चार महिन्यांत प्राथमिक तपास करण्याचे सांगितले जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी सभागृहात देवस्थान जमिनीचा मुद्दा उपस्थित केला होता.

‘पिंपळेश्वर महादेव देवस्थान, विठोबा देवस्थान, खर्ड्याचे रामचंद्र देवस्थान ही हिंदू देवांची मंदिरे आहेत. या देवस्थानच्या ट्रस्टची जमिन हडप करण्याचा मोठा प्रकार बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात झाला आहे. हे प्रकरण फार गंभीर आहे. पोलीस यामध्ये वेळकाढूपणा करीत आहेत. या प्रकरणातील गुन्हेगारांना अटक होऊन किती दिवसांत कारवाई केली जाईल? देवस्थानांना जमिनी परत मिळतील का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी सभागृहात केला होता.

Chhatrapati Sambhajinagar : औरंगजेबाच्या कबरीबाबत मनसे नेत्याचा जलील यांना ‘हा’ सल्ला

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले…
देवस्थानच्या जमिनी कोणीही गैर प्रकारातून विकल्या असतील तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. न्यायालयाच्या आदेशानुसार एफआयआर दाखल केला आहे. जवाब नोंदणी चालू आहे. यामध्ये काही सरकारी कर्मचारी देखील आहेत. हा प्रकार गंभीर आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

जयंत पाटील म्हणाले…
पिंपळेश्वर महादेव देवस्थान ट्रस्टची 50-60 एकर जमिन एका दूध संघाच्या कर्मचाऱ्यांचा नावाने झाली आहे. विठोबा देवस्थान खर्ड्याची जमिन मुर्शदपुरला आहे. ती जमिन मनोज रत्नपारखी याच्या नावाने झाली आहे. रामचंद्र देवस्थान कोयाळची जमिन रोहित जोशी, अहमदनगर याच्या नावे झाली आहे. पुन्हा विठोबा देवस्थानची जमिन रोहित जोशी याचे नावे झाली आहे. या सर्व प्रकरणाची तक्रार झाली, चौकशी झाली. पण सरकार बदलल्यानंतर तक्रारदाराचे संरक्षण काढण्यात आले. त्यानंतर अहमदनगर येथे तक्रारदारावर पॉक्सोचा खोटा गुन्हा दाखल झाला, असे जयंत पाटील म्हणाले.

Tags

follow us