Download App

साई रिसॉर्टप्रकरणी अधिकारीही गोत्यात, तत्कालीन उपजिल्हाधिकाऱ्यांना अटक

मुंबई : दापोलीतील साई रिसॉर्टप्रकरणी (Sai Resort case) तत्कालीन उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे (Jairam Deshpande) यांना ईडीने अटक केली आहे. त्यांच्यावर बेकायदेशीर परवाना दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या संदर्भात भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांनी ट्विट करत जयराम देशपांडे यांनी अनिल परब, सदानंद कदम यांच्या संगनमताने फसवी परवानगी दिल्याचे म्हटले आहे.

याआधी ठाकरे गटाचे अनिल परब यांचे निकटवर्ती सदानंद कदम यांना ईडीने अटक केली आहे. या प्रकरणात अनिल परब यांनी धाव उच्च न्यायालयात घेतली होती. याचिका प्रलंबित असेपर्यंत ईडीच्या कारवाईपासून संरक्षण मागितले होते. यानंतर न्यायालयाने अनिल परब यांना दिलासा दिला. 20 मार्च पर्यंत अंतरिम संरक्षण देत कठोर कारवाई न करण्याचे निर्देश दिले आहेत.

कसब्यातील पराभवानंतर पुणे भाजप शहराध्यक्ष बदलाची कुजबूज

किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले की, अनिल परब साई रिसॉर्ट घोटाळ्यात आम्ही जयराम देशपांडे यांच्या विरोधात विविध प्राधिकरणांकडे तक्रार केली होती. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने त्यांना निलंबित केले होते. आता ईडीने अटक केली आहे. त्यांना कोर्टाने 18 मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे. तत्कालीन उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे यांनी अनिल परब, सदानंद कदम यांच्या संगनमताने सीआरझेड नो डेव्हलपमेंट झोनमधील साई रिसॉर्ट बांधकामाला फसवी परवानगी दिली होती.

साई रिसॉर्टच्या बेकायदा बांधकामाचं प्रकरण राज्यातील राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून चांगलचं गाजत आहे. या प्रकरणात याआधी ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचं नाव पुढं आलं होतं. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हे प्रकरण उचलून धरत अनेक ठिकाणी तक्रारी केल्या होत्या. हे बांधकाम अनाधिकृत आहे, असा आरोप सोमय्यांनी केला होता. शिवाय, या बांधकामासाठी आर्थिक गैरव्यवहार झाल्याचं सोमय्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर परब यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Tags

follow us