Download App

Video : आता हिंदू जागे झालेत; ‘वक्फ’ विधेयकाबाबत आभार मानत ठाकरेंनी सांगितली भाजपची चाल

उद्धव ठाकरे यांनी वक्फ बिलासंदर्भात भूमिका स्पष्ट करत भाजपवर घणाघाती टीका केली.

Uddhav Thackeray Press Conference On Waqf Bill : वक्फ संशोधन विधेयक काल लोकसभेत मंजूर (Waqf Amendment Bill) करण्यात आले. आज राज्यसभेत या विधेयकावर चर्चा सुरू आहे. विरोधकांकडून केंद्र सरकारवर टीकेची झोड उठली आहे. यातच उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. वक्फ बिलासंदर्भात भूमिका स्पष्ट करत भाजपवर घणाघाती टीका केली. ठाकरे म्हणाले, भाजपाचं सध्या काय चाललंय हेच कळत नाही. कधी सांगतात औरंजेबाची कबर खोदा, ह्यांचे लोक कुदळ फावडी घेऊन गेले की आदेश येतो आता थांबा खोदू नका. भाजपाचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत.

जम्मू काश्मीरमधून 370 कलम हटवण्यात आले तेव्हा आम्ही पाठिंबाच दिला होता. हजारो काश्मिरी पंडीत निर्वासित झाले होते त्यावेळी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना आश्रय दिला होता. आता 370 कलम काढून टाकून इतकी वर्षे उलटून गेली यातील किती काश्मिरी पंडितांना जमिनी मिळाल्या. या प्रश्नाचं उत्तर भाजपाच्या लोकांनी आणि गृहमंत्र्यांनी द्यावं. ह्यांनी पीओकेबाबत काहीच भूमिका घेतली नाही. चीनने जे अतिक्रमण त्यावर कुणी काहीच बोलायला तयार नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

वक्फच्या जमिनींवर भाजपाचा डोळा

वक्फच्या जमिनी ताब्यात घेतल्या जाणार हेच आता दिसत आहे. वक्फच्या जमिनींवर ह्यांचा डोळा आहे. काल अमित शाहांनी तर जिन्नांनाही लाजवेल अशा पद्धतीने मुस्लिमांची बाजू घेतली. मग तुम्ही हिंदुत्व सोडलं का असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला. बाळासाहेबांनी मुस्लिमांना इज्तेमासाठी परवानगी दिली होती. तीच जागा आता व्यापाऱ्यांसाठी उद्योजकांच्या खिशात घातली जात आहे. किरेन रिजिजूंपासून सर्वजण माना खाली घालून पाहत होते. हे काय चाललंय. वक्फ सुधारणा विधेयक मुस्लिमांच्या हिताचं आहे का असेल तर मग हिंदुत्व तुम्ही सोडलं की आम्ही सोडलं असाही सवाल ठाकरेंनी भाजपला विचारला.

भाजपवाल्यांनो जुमलेबाजी बंद करा

संसदेच्या जागेवर वक्फचा दावा ही निव्वळ लावालावी आहे. भाजपने जुमलेबाजी आधी बंद करावी. गरिबांमधील मारामाऱ्या बंद कराव्या. आम्ही बिलाला नाहीतर भ्रष्टाचाराला विरोध केला आहे. विधेयकासंदर्भात विरोधकांनी सुचवलेल्या सुधारणांकडे सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केले. काँग्रेसचा आमच्यावर आजिबात दबाव नाही. आम्ही एनडीएत असतो तरीही अशीच भूमिका घेतली असती. आमची भूमिका पक्षाच्या कार्यकर्त्याला पटली आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले.

 

follow us