Download App

Uddhav Thackeray : अमित शहांवर येणार निवडणूक बंदी? बाळासाहेबांच्या कारवाईचा दाखला देत ठाकरेंनी घेरलं

Image Credit: letsupp

Uddhav Thackeray : देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर (Election Results 2023) झाले. या निवडणुकीत पुन्हा एकदा पीएम मोदींची जादू चालली. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील मतदारांनी भाजपला भरभरून मतांचं दान केले. या राज्यांत काँग्रेसच्या तुलनेत भाजपाचा प्रचार उजवा ठरला. पण, आता या निवडणुकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी एक आश्वासन दिलं होतं. त्यांचं हेच आश्वासन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाच्या निशाण्यावर आलं आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील कारवाईचा संदर्भ देत आता निवडणूक आयोग (Election Commission) तशीच कारवाई अमित शहा यांच्यावर करणार का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. जर त्यांच्यावर कारवाई होणार नसेल तर मग आमच्यावरही कारवाई करू नका, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत निवडणूक आयोगाला सुनावले.

उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज नुतनीकरण करण्यात आलेल्या ‘शिवालय’ या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच निवडणूक आयोगाला काही दिवसांपूर्वी पाठवलेल्या पत्राची आठवण करून देत खडेबोल सुनावले आहेत. यावेळी उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

..तर मग आता आमच्यावरही कारवाई करू नका 

निवडणूक आयोगाला पत्र पाठवत आम्ही प्रश्न विचारला होता की देवाच्या आणि धर्माच्या नावावर मतं मागणं गुन्हा ठरतो का. कर्नाटकच्या निवडणुकीत पंतप्रधान मोदी बजरंग बली की जय म्हणत मतं मागतात. मध्य प्रदेशच्या निवडणुकीत भाजप सत्तेत आल्यास अयोध्येतील श्रीरामाचं मोफत दर्शन घडवू असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले होते. त्याचवेळी मी आठवण करून दिली होती की हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळेला आपल्या भाषणात हिंदुत्वाचा मुद्दा घेतला होता, राम मंदिराचा मुद्दा घेतला होता. त्यावेळी निवडणूक आयोगाने त्यांना सहा वर्षांसाठी निवडणूक लढण्यास बंदी केली होती. मतदानाचा अधिकार सुद्धा काढून घेतला होता. आज त्यात काही बदल झाला आहे का, असा प्रश्न मी आयोगाला विचारला होता. त्या पत्राचं उत्तर अजूनही मला मिळालेलं नाही.

तर मग आता आम्ही असं मानायचं का की देवाच्या धर्माच्या नावावर मते मागायला काही हरकत नाही. जर थोड्या दिवसात तुमचं उत्तर आलं नाही तर आगामी सर्व निवडणुकांत हर हर महादेव, गणपती बाप्पा मोरया असे म्हणत आमचे जे काही हिंदुत्वाचे प्रश्न आहेत ते उघडपणाने मांडू त्यावेळी मग आमच्यावरही कारवाई करू नका.

काय म्हणाले होते मोदी-शहा? 

मध्य प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीतील एका प्रचार सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उपस्थित नागरिकांना संबोधित करताना जर मध्य प्रदेशात पुन्हा भारतीय जनता पार्टीचे सरकार आले तर अयोध्येतील प्रभू श्रीरामांचे मोफत दर्शन घडवू असे आश्वासन दिले होते. तर त्याआधी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत पंतप्रधान मोदी यांनी बजरंग बली की जय म्हणत मतदारांनी मतदान करण्याचे सांगितले होते.

बाळासाहेबांच्या मतदानाच्या हक्कावर बंदीची कारवाई  

सन 1987 मध्ये विलेपार्ले विधानसभेच्या पोटनिवडणुकीत बाळासाहेबांनी हिंदुत्वाच्या नावावर मत मागितल्याचा ठपका ठेवण्यात आा होता. या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार डॉ. सुरेश प्रभू रिंगणात होते. तर त्यांच्याविरोधात काँग्रसचे प्रभाकर कुंटे निवडणूक लढवत होते. या निवडणुकीत कुंटे यांचा पराभव झाला. त्यानंतर कुंटे यांनी हायकोर्टात याचिका दाखल करत निकालाला आव्हान दिलं होतं. त्यावेळी ही निवडणूक हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढली गेली होती. या निवडणुकीच्या प्रचारात बाळासाहेबांनी गर्व से कहो हम हिंदू है चा नारा दिला होता. बाळासाहेबांनी जात आणि धर्माच्या नावावर मत मागितल्याचा आरोप कुंटे यांनी न्यायालयात केला होता. त्यानंतर निवडणूक आयोगानेही दखल घेत 1999 मध्ये बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला. 1999 ते 2005 या काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना मतदान आणि निवडणूक लढण्यास बंदी होती.

follow us

वेब स्टोरीज