मुंबई : मागील काळात ज्यांनी आम्हाला त्रास दिला त्यांचा आम्ही बदला घेतला. त्यांना आता आम्ही माफ केलं, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी उद्धव ठाकरे यांना उद्देशून केलं होतं. फडणवीसांच्या त्या वक्तव्याला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. रोज आमच्या आमदार, खासदारांवर धाडी टाकल्या जात आहेत तो सूड नाही का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, त्यांच्यासोबत जे गेले नाहीत त्यांच्याविरोधात सूडाने पेटून सत्तेचा गैरवापर केला जात आहे. राजन साळवी, वैभव नाईक, नितीन देशमुख, अनिल परब, काही नगरसेवक यांच्यावर ईडी, सीबीआयच्या धाडी टाकल्या जात आहेत. तो बदला नाही का? सुडामध्ये येत नाहीत का?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.
आज मुंबईत कसब्याचे काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार टीका केली. पुढं बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, विरोधक जर एकत्र आले तर आपण जिंकू शकतो हे कसब्याच्या निवडणुकीने दाखवून दिले आहे. जॉर्ज फर्नांडिस आणि स.का. पाटील यांच्या निवडणुकीची यानिमित्ताने आठवण येते. गेली तीस वर्षे कसबा हा भाजपचा बालेकिल्ला होता. धंगेकरांच्या विजयाने भाजपचा बालेकिल्ला भुईसपाट करुन आपण जिंकू शकतो. हा आत्मविश्वास फक्त पुणे किंवा महाराष्ट्रातील जनतेला दिला नाही तर देशातील जनतेला पुढची दिशा दाखवली आहे, असा वक्तव्य माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.
नवाब मलिकांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ
धंगेकर पुण्यात पराक्रम गाजवून आले आहेत. सोबतीला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे खंदे कार्यकर्ते आहेत. धंगेकर पूर्वीचे आमचे नगरसेवक होते. त्यामुळे माझा माणूस आमदार झाला याचा मला आनंद आहे. आमचे पूर्वीचे ऋणुबंध आहेत. आता ज्याप्रकारे सर्व एकत्र आलो आहेत. याचप्रमाणे सगळ्या निवडणुका एकत्रितपणे लढू आणि जिंकूया, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
तुम्ही पंतप्रधान होणार असे वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं. यावर उद्धव ठाकरे म्हणाले, माझ्या मनात कोणतेही स्वप्न नाही. स्वप्नांत रंगणारा मी नाही. जी जबाबदारी आहे ती मी पार पाडत असतो. माझ्यावर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आली. ती कशी आली होती ते सांगितलेलं आहे. त्यामुळे माझ्या मनात कोणतेही स्वप्न नाहीत. देशातील लोकशाही जिंवत ठेवण्याचं काम सर्वसामान्य लोकांना खांद्यावर घेतलं पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.