Download App

उर्फी राहणार पोलीस संरक्षणात, चाकणकरांचं पोलीस आयुक्तांना पत्र

मुंबई : अभिनेत्री उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद काही मिटायचं नाव घेताना दिसेना. उर्फीच्या तोकड्या कपड्यांवरुन चित्रा वाघ यांनी आक्षेप घेतला आहे. त्यावरुन उर्फीनं शुक्रवारी राज्य महिला आयोगाला भेट देखील दिली. आपल्याला धमकी दिल्याप्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याविरोधात तक्रार केली. आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या तक्रारीची दखल घेतली आहे. मुंबई पोलीस आयुक्तांना आवश्यक कारवाई करुन उर्फी जावेदला पोलीस संरक्षण देण्याच्या सूचना पत्राद्वारे दिल्या आहेत.

रुपाली चाकणकर यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, महाराष्ट्र राज्य महिला आयोगास उर्फी जावेद यांचा तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. यामध्ये अर्जदार असे नमूद करतात की, मी सिनेसृष्टीशी संबंधित असलेल्या फॅशन इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे, माझं राहणीमान आणि दिसणं व्यावसायिकदृष्ट्या आवश्यक आहे, असे असतानाही त्याबाबत नाहक तक्रारी करून चित्रा किशोर वाघ यांनी केवळ स्वतःच्या राजकीय फायद्याकरिता किंवा वैयक्तिक प्रसिद्धीकरिता मला मारहाण करण्याच्या धमक्या प्रसारमाध्यमावरून जाहीरपणे दिल्या आहेत, सबब माझ्यावर हल्ला होऊ शकतो. त्यामुळं मला असुरक्षित वातावरण निर्माण होऊन मला मुक्तपणे वावरता येत नाही म्हणून मला सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात यावी.

मुक्त संचाराचा हक्क घटनेनं प्रत्येक भारतीयाला दिला आहे , महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईसारख्या शहरात असुरक्षित वाटणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तांनी यावर तात्काळ कारवाई करावी व केलेल्या कार्यवाहीबाबतचा अहवाल राज्य महिला आयोगास सादर करावा, अशा सूचना आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिल्या आहेत. त्यामुळं आता अभिनेत्री उर्फी जावेद यांना पोलीस संरक्षण मिळणार का हे देखील पाहावं लागणार आहे.

Tags

follow us