मुंबईः मुंबईत पूर्णपणे भारतीय बनावटीची वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) ट्रेन दाखल झाली आहे. भारताच्या प्रगत तंत्रज्ञान क्षेत्राचे उत्तम उदाहरण असलेली ही एक्सप्रेस येत्या १० फेब्रुवारीपासून प्रवाशांच्या सेवेत हजर होणार आहे. या एक्सप्रेसमुळे भाविकांना शिर्डीच्या साईबाबांचे आणि पंढरीच्या विठुरायाचे दर्शन घेऊन मुंबईला एका दिवसात परत येऊ शकणार आहे. या ट्रेनची यशस्वी चाचणी झाली आहे.
10 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत येत आहेत. पंतप्रधानांनी झेंडा दाखवल्यावर उद्घाटनीय फेरी सीएसएमटी येथून शिर्डीसाठी, तर सोलापूरवरून मुंबईसाठी रवाना करण्यात येणार आहे. शिर्डी ते मुंबई अंतर ३८५ किलोमीटर आहे. मुंबई-शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस नियमितपणे सीएसएमटीहून सकाळी सव्वा सहाला रवाना होईल. ती ट्रेन शिर्डीत दुपारी 12.10 ला पोहोचेल. परतीचा प्रवास सायंकाळी 5 वाजून २५ मिनिटाला सुरू होईल. ट्रेन मुंबईत रात्री 11 वाजून १८ वाजता दाखल होईल. नव्या गाडीने पाच तास 55 मिनिटांत प्रवास पूर्ण होणार आहे. मंगळवार वगळता उर्वरित दिवशी वंदे भारत सेवा देणार आहे.
सोलापूर ते मुंबई हे अंतर रेल्वेने 455 किलोमीटर आहे. एक्सप्रेस गाडीला या प्रवासासाठी साधारण साडेआठ तास लागतात. मात्र वंदे भारत एक्सप्रेस साडेसहा तासांत हा प्रवास पूर्ण करू शकणार आहे. सोलापूर ते मुंबई या वंदे भारत एक्स्प्रेसची ट्रायल रनही गुरुवारी पार पडली आहे. वंदे भारत एक्सप्रेस सकाळी ६.०५ वाजता मुंबईला निघेल आणि दुपारी साडेबारापर्यंत मुंबईत पोहचणार आहे.
या प्रवासात ट्रेन काही ठिकाणी थांबणार आहे. पण हे स्थानके अद्याप निश्चित नाहीत. तसेच भाडेही अद्याप निश्चित झालेले नाही.