Download App

कर्नाटकमध्ये ‘ऑपरेशन लोटस’ची सुरुवात? 11 असमाधानी आमदारांचा लेटर बॉम्ब; काँग्रेसमध्ये खळबळ

  • Written By: Last Updated:

बंगळुरू : कर्नाटकमध्ये काँग्रेसचे (Congress) सरकार स्थापन होऊन अवघे दोने महिने झाले आहेत. मात्र अशातच राज्यातील 11 आमदार सिद्धरामय्या सरकारवर नाराज असल्याचं वृत्त आहे. नुकतचं राज्यातील 11 आमदारांचे एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एकूण 20 मंत्री आपली काम नीट करत नाहीत, असा आरोप करत आमदारांनी खळबळ उडवून दिली आहे. आपापल्या भागात काम करताना अडचणी येत असल्याचा दावा आमदारांनाही या पत्राद्वारे केला आहे.  (11 mlas complaint to CM Siddhramaya and DCM DK Shivkumar)

ऑपरेशन लोटसची सुरुवात?

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी भाजपवर ऑपरेशन लोटसची सुरुवात केल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, भाजप आणि जेडी(एस) नेते एकत्र येण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांची बंगळुरू किंवा नवी दिल्लीत बैठक होऊ शकली नाही आणि आता त्यांनी सिंगापूरची तिकिटे बुक केली आहेत. आमचे शत्रू मित्र झाले आहेत. माझ्याकडे अशा लोकांची माहिती आहे जे सिंगापूरला फक्त कर्नाटकातील काँग्रेस सरकार अस्थिर करण्याचा प्लॅन रचण्यासाठी गेले आहेत. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांमध्येच आमदारांची पत्र धडकल्याने काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे.

पत्रात काय लिहिले आहे?

काँग्रेसच्या 11 आमदारांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र लिहून कामात येणाऱ्या अडचणींची माहिती दिली आहे. हे पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं असून ते बीआर पाटील यांच्या लेटरहेडवर लिहिले आहे. गुलबर्गा जिल्ह्यातील काँग्रेस आमदार बी.आर. पाटील आणि इतर 10 जणांनी पत्रात म्हंटलं की, आम्ही लोकांच्या विश्वासानुसार, काम करू शकत नाही. 20 हून अधिक मंत्री आमच्या मतदारसंघातील कामाबद्दल प्रतिसाद देत नाहीत. मंत्री लोकांच्या अपेक्षा पूर्ण करत नाहीत. ते सहकार्य करत नसल्याने कामे पूर्ण होणार नाहीत.

NASA ; ‘नासा’ची 90 मिनिटं बत्ती गुल, कट्टर दुश्मन धावला मदतीला 

जेव्हा आम्हाला प्रकल्पांसाठी निधीची चर्चा करायची असते तेव्हा मंत्र्यांपर्यंत पोहोचणे कठीण होतं. त्यांना कामाची माहिती देण्यासाठी त्रयस्थ व्यक्तीशी संपर्क साधावा लागतो. अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी आमच्या शिफारस पत्रांचा विचार केला जात नाही. कोणताही अधिकारी आमचं ऐकत नाही. अशा अनेक तक्रारी पत्रात करण्यात आल्या आहेत.  दरम्यान, आलंडच्या आमदाराने कबूल केले की त्यांनी एक पत्र लिहिले आहे, परंतु “आमचे पत्र वेगळे होते,” असा दावा त्यांनी केला आहे. त्यांनी पत्रातील तपशील सांगण्यास नकार दिला. मात्र, बनावट पत्रावरून आपण पोलिसांत तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी काय स्पष्टीकरण दिले?

सीएम सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांनी मंगळवारी राज्य काँग्रेसमध्ये असंतोष असल्याच्या बातम्या आणि अफवांचे खंडन केले. व्हायरल झालेल्या पत्रात एकही अधिकारी आमदारांचे ऐकत नसल्याचा आरोप होत आहे. आता या पत्राबाबत सीएम सिद्धरामय्या यांना प्रश्न विचारला असता, ते म्हणाले की, याबाबत तुम्हाला कोणी सांगितले? असा प्रतिप्रश्न केला. तर उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनीही स्पष्ट केले की, आम्ही सर्व मंत्र्यांना सर्व आमदारांना सोबत घेण्यास सांगितले आहे, जे हरले त्यांच्याशी बोला. त्यांचीही कामे करा, असं सांगितलं. प्रत्येकजण आपापली कामे करत आहे. पत्रात जे लिहिलं, तसं काहीही नाही. या फक्त अफवा पसरवल्या आहेत.

Tags

follow us