Download App

भाजपचा आयारामांवर दृढ विश्वास : 400 पैकी 116 उमेदवार इतर पक्षांमधून आलेले, महाराष्ट्रात किती?

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षामध्ये (BJP) इतर पक्षांमधून होणारे पक्षप्रवेश आणि त्यांना मिळणारी व्हीआयपी ट्रिटमेंट हा कायमच चर्चेचा विषय असतो. अशात सध्याच्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) भाजपने आतापर्यंत जाहीर केलेल्या एकूण जागांपैकी तब्बल 28 टक्के उमेदवार हे इतर पक्षांमधून आयात केले असल्याचे समोर आले आहे. लोकमत न्यूज नेटवर्कने याबाबतचे वृत्त दिले आहे. (28 percent of the total seats announced by the BJP so far in the Lok Sabha elections were imported from other parties)

लोकमत न्यूज नेटवर्कने दिलेल्या वृत्तानुसार, लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपने आतापर्यंत 417 उमेदवारांची घोषणा केली आहे. यातील 18 राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये तब्बल 28 टक्के म्हणजे साधारण 116 उमेदवार हे आयात केलेल आहेत. यामध्ये राज्यनिहाय आकडेवारी बघितल्यास उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक आयात उमेदवार आहेत.

कॉंग्रेस कडू कारले तर ठाकरेंची नकली सेना; पंतप्रधान मोदींचा कॉंग्रेससह ठाकरे गटावर निशाणा

उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या 80 जागा आहेत. तिथे आतापर्यंत भाजपने 64 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. यापैकी 20 जागांवर निवडणुकीपूर्वी इतर पक्षामधून भाजपमध्ये आलेल्या नेत्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय तामिळनाडूत 11, पश्चिम बंगाल आणि ओडिशात प्रत्येकी आठ तर महाराष्ट्रात सात आयाराम भाजपने तिकीट दिले आहे.

PM Modi : कमिशन द्या नाहीतर कामाला ब्रेक लावा, पीएम मोदींचा ‘मविआ’ सरकारवर हल्लाबोल

सहा राज्यांमध्ये 50 टक्के आयात उमेदवार :

लोकमत न्यूज नेटवर्कने दिलेल्या वृत्तानुसार, सहा राज्यांमध्ये भाजपने 50 टक्क्यांहून अधिक आयात उमेदवारांना तिकीटे दिली आहेत. यात आंध्रप्रदेशमध्ये सहापैकी पाच उमेदवार आयात करण्यात आले आहेत. हे प्रमाण तब्बल 83 टक्के आहे. तरक तेलंगणामध्ये भाजपने 17 उमेदवार उभे केले आहेत. त्यापैकी 12 जण इतर पक्षातून भाजपमध्ये आले आहेत. हे प्रमाण 71 टक्के आहे.

याशिवाय पंजाबमध्ये 66 टक्के, हरयाणात 60 टक्के उमेदवार हे भाजपने इतर पक्षातून घेतले आहेत. पुद्दुचेरीमधील एकमेव उमेदवार हा दुसऱ्या पक्षाचा आहे. त्यामुळेच भाजपने 400 पारचा आकडा गाठण्यासाठी आयात नेत्यांना तिकीट देण्यात कोणताही संकोच केलेला दिसून येत नाही, असेच म्हणावे लागेल.

follow us