नवी दिल्ली : “दरवर्षी हजारो विद्यार्थी स्वतःचा देश सोडून इतर देशांचे नागरिकत्व स्वीकारतात, कारण त्यांच्यात देशभक्ताचा अभाव असतो. त्यासाठी त्यांची मुळे समजून सांगणे आणि त्यांच्या देशाबद्दल, संस्कृतीबद्दल प्रेम वाढवणे महत्त्वाचे आहे, असे निरीक्षण नोंदवत एनसीईआरटीने (NCERT) स्थापन केलेल्या समितीने पाठ्यपुस्तकांमध्ये रामायण आणि महाभारत यासारख्या महाकाव्यांचा समावेश करण्याची आणि वर्गाच्या भिंतींवर राज्यघटनेची प्रस्तावना लिहिण्याची शिफारस केली आहे. (A committee set up by NCERT has recommended teaching Ramayana, Mahabharata and the Constitution to students to make them patriotic)
नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT) ने सामाजिक शास्त्रांसाठी शालेय अभ्यासक्रमात सुधारणा करण्यासाठी सीआय इसाक यांच्या अध्यक्षतेत एका समितीची स्थापना केली होती. याच समितीने ही शिफारस केली आहे. पाठ्यपुस्तके आणि शिक्षण साहित्य अंतिम करण्यासाठी जुलैमध्ये अधिसूचित केलेल्या 19 सदस्यीय राष्ट्रीय अभ्यासक्रम आणि अध्यापन साहित्य समिती (NSTC) द्वारे आता इसाक समितीच्या शिफारसी विचारात घेतल्या जाऊ शकतात.
इयत्ता 7 ते 12 मधील विद्यार्थ्यांना रामायण आणि महाभारत शिकवणे महत्त्वाचे आहे, यावर जोर देत इसाक म्हणाले, “समितीने विद्यार्थ्यांना सामाजिक विज्ञान अभ्यासक्रमात रामायण आणि महाभारत यांसारखी महाकाव्ये शिकवण्याचा आग्रह धरला आहे. आम्हांला वाटतं की यामुळे किशोरवयीन विद्यार्थ्यांमध्ये त्यांचा स्वाभिमान, देशभक्ती आणि त्यांच्या राष्ट्राचा अभिमान निर्माण होण्यास मदत होईल. दरवर्षी हजारो विद्यार्थी देश सोडून इतर देशांचे नागरिकत्व स्वीकारतात, कारण त्यांच्यात देशभक्तीचा अभाव असतो. त्यासाठी त्यांची मुळे समजून सांगणे आणि त्यांच्या देशाबद्दल, संस्कृतीबद्दल प्रेम वाढवणे महत्त्वाचे आहे.
“काही शिक्षण संस्था, सध्या विद्यार्थ्यांना रामायण शिकवत असले तरी ते एक काल्पनिक कथा म्हणून शिकवतात. पण जर विद्यार्थ्यांना ही महाकाव्ये शिकवली गेली नाहीत तर शिक्षण व्यवस्थेचा कोणताही उद्देश साध्य होणरा नाही आणि ती राष्ट्रसेवा होणार नाही. शिवाय इयत्ता 3 ते 12 च्या पाठ्यपुस्तकांच्या अभ्यासक्रमात प्राचीन इतिहासाऐवजी ‘अभिजात इतिहास’ समाविष्ट करावा. पाठ्यपुस्तकांमध्ये ‘इंडिया’ नावाच्या जागी ‘भारत’ ठेवण्याची शिफारसही पॅनेलने केली होती, असे इसाक यांनी सांगितले.
रामायण आणि महाभारताचा अभ्यासक्रमात समावेश करण्याची शिफारस यापूर्वीही करण्यात आली होती. समितीने कोणत्याही नव्या शिफारसी केलेल्या नाहीत. तसेच वर्गाच्या भिंतींवर राज्यघटनेची प्रस्तावना लिहिण्याची शिफारस करण्यामागेही देशभक्तीचा हेतू आहे. आमची प्रस्तावना उदात्त आहे. यात लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेसह सामाजिक मूल्यांना महत्त्व दिले जाते. म्हणून, आम्ही ते वर्गाच्या भिंतींवर लिहिण्याची शिफारस केली आहे जेणेकरुन प्रत्येकाला ते समजू शकेल आणि त्यातून शिकता येईल, असा दावा इसाक यांनी केला.