भारतीय वैद्यकीय क्षेत्रात रचला इतिहास! AIIMS दिल्लीकडून आईच्या गर्भातच बाळाच्या मणक्याची यशस्वी शस्त्रक्रिया

गर्भातील बाळाची तपासणी, वैद्यकीय सल्लामसलत, भूल देण्याची तयारी आणि शस्त्रक्रियेचे प्रात्यक्षिक अशा अनेक टप्प्यांनंतर ही प्रक्रिया पार पडली.

Untitled Design   2026 11 16T095302.153

Untitled Design 2026 11 16T095302.153

A historic achievement of AIIMS Delhi : वैद्यकीय क्षेत्रात भारताने मोठी कामगिरी केली आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयातील डॉक्टरांनी आईच्या गर्भात असलेल्या 25 आठवड्यांच्या बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. बाळाच्या मणक्यातील गंभीर दोष दुरुस्त करण्यासाठी गर्भाशयातच ही शस्त्रक्रिया करण्यात आली. भारतातील अशा प्रकारची ही पहिलीच ओपन फिटल सर्जरी असल्याचे एम्सने सांगितले आहे.

12 नोव्हेंबर रोजी तब्बल सहा तास ही शस्त्रक्रिया सुरू होती. बाळाला ‘लंबोसॅक्रल मायलोमेनिंगोसील’ हा स्पायना बिफिडाचा गंभीर प्रकार होता. या आजारात मणक्याला असलेल्या उघड्या दोषातून पाठीचा कणा आणि त्यावरील आवरण बाहेर येते. त्यामुळे बाळाच्या मज्जासंस्थेला गंभीर नुकसान होण्याचा धोका असतो. हे नुकसान रोखण्यासाठी बाळाचा जन्म होण्यापूर्वीच शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या शस्त्रक्रियेपूर्वी डॉक्टरांनी पाच आठवड्यांहून अधिक काळ नियोजन केले होते. गर्भातील बाळाची सविस्तर तपासणी, वैद्यकीय सल्लामसलत, भूल देण्याची तयारी आणि शस्त्रक्रियेचे प्रात्यक्षिक अशा अनेक टप्प्यांनंतर ही प्रक्रिया पार पडली. न्यूरोसर्जन डॉ. दीपक गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली ही शस्त्रक्रिया करण्यात आली. तर मातृ-गर्भवैद्यक आणि प्रसूती विभागाचे नेतृत्व डॉ. नीना मल्होत्रा आणि डॉ. के. अपर्णा शर्मा यांनी केले. या संपूर्ण प्रक्रियेत 30 हून अधिक डॉक्टर, तज्ज्ञ आणि नर्सेस सहभागी झाले होते.

इराणचा अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला? बहरीनमध्ये खळबळ, होर्मुझमध्ये दोन टँकरना आग

डॉक्टरांच्या मते, योग्य रुग्णांची निवड करून गर्भातच शस्त्रक्रिया केल्यास मज्जासंस्थेचे पुढील नुकसान कमी करता येऊ शकते. तसेच मेंदूमध्ये पाणी साचण्याच्या समस्येमुळे करावी लागणारी शस्त्रक्रिया टाळण्याची शक्यता वाढू शकते आणि काही न्यूरोलॉजिकल परिणाम सुधारू शकतात. मात्र, ही शस्त्रक्रिया आजारावर पूर्ण उपचार किंवा हमखास बरे होण्याची हमी नाही. बाळाच्या जन्मानंतरही दीर्घकाळ वैद्यकीय देखरेख आवश्यक असते.

आंतरराष्ट्रीय संशोधनातूनही गर्भातील शस्त्रक्रियेचे काही फायदे समोर आले आहेत. MOMS या अभ्यासानुसार, गर्भातच शस्त्रक्रिया झालेल्या मुलांपैकी 40 टक्के मुलांना जन्मानंतर 12 महिन्यांच्या आत मेंदूतील अतिरिक्त द्रव बाहेर काढण्यासाठी शंट लावण्याची गरज पडली. तर जन्मानंतर शस्त्रक्रिया झालेल्या गटात हे प्रमाण 82 टक्के होते. मात्र, गर्भातील शस्त्रक्रियेमुळे मुदतपूर्व प्रसूती आणि गर्भाशयाच्या जखमेशी संबंधित गुंतागुंतीचा धोका असतो. त्यामुळे ही शस्त्रक्रिया केवळ विशेष तज्ज्ञ केंद्रांमध्ये आणि निवडक गर्भवती महिलांसाठीच केली जाते.

राज्यात थंडीची चाहूल अन् चक्रीवादळाचं सावट! 19 नोव्हेंबरला विदर्भात पाऊस, एल निनोमुळे थंडीही कमी?

विशेष म्हणजे, ही संपूर्ण शस्त्रक्रिया केंद्र सरकारच्या ‘जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमांतर्गत’ मोफत करण्यात आली. सध्या आई आणि बाळाच्या प्रकृतीवर डॉक्टरांची विशेष देखरेख सुरू आहे. गर्भावस्थेच्या उर्वरित काळात, प्रसूतीदरम्यान आणि बाळाच्या जन्मानंतरही विविध विभागांचे तज्ज्ञ सातत्याने निरीक्षण करणार आहेत. एम्सने सांगितले की, गर्भातील मणक्याच्या शस्त्रक्रियेची क्षमता विकसित करण्यासाठी गेल्या 14 वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. आता हे स्वप्न प्रत्यक्षात उतरले असून, भविष्यात अशा उपचारांची गरज असलेल्या भारतीय कुटुंबांपर्यंत ही सुविधा सुरक्षितपणे पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे.

दरम्यान, डॉक्टरांनी गर्भातील शस्त्रक्रियेइतकेच जन्मापूर्वीच्या प्रतिबंधात्मक उपायांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. गर्भधारणेपूर्वी फॉलिक अॅसिड घेण्याबाबत योग्य सल्ला, अन्नपदार्थांमध्ये फोलेटचे प्रमाण वाढवणे आणि अशा जन्मजात दोषांवर राष्ट्रीय स्तरावर देखरेख ठेवणे आवश्यक असल्याचे एम्सने स्पष्ट केले आहे.

Exit mobile version