“सनातन धर्म हा डेंग्यू आणि मलेरिया सारखा आहे. याला केवळ विरोध करु नये तर तो संपवून टाकावा”, असं म्हणत तामिळनाडू सरकारमधील मंत्री आणि मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी खळबळ उडवून दिली आहे. सनातन निर्मूलन परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन मोठा गदारोळ सुरु झाला असून भाजपमधून त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे. याशिवाय भाजपपाठोपाठ इंडिया आघाडीतील पक्षांनीही उदयनिधी स्टॅलिन यांना फटकारलं आहे. राष्ट्रीय जनता दलाने तर हे विधानच मागे घ्यावे अशी मागणी केली आहे. (After the BJP, the India Alliance parties have also criticized Udayanidhi Stalin)
उदयनिधी स्टॅलिन यांच्या वक्तव्यावर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, याप्रकरणी काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. आम्हाला कोणत्याही धर्मावर भाष्य करायचे नाही. किंवा कोणाच्याही भावना दुखवायच्या नाहीत. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात सर्व धर्मांना समानतेची भूमिका दिली आहे, तीच भूमिका आपण पाळतो, असेही ते म्हणाले. कोण काय म्हणाले ते आपल्या हातात नाही.
राजद नेते मृत्युंजय तिवारी म्हणाले की, सनातन धर्मावर प्रश्न विचारण्याचा अधिकार कोणालाही नाही. ते म्हणाले, “भाजपही सनातनच्या नावावर राजकारण करत आहे. हा राजकारणाचा विषय नाही. असे वक्तव्य कोणी केले असेल, तर त्यांनी तात्काळ सनातनची माफी मागून हे वक्तव्य मागे घ्यावे.”
उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माविरोधात चिथावणीखोर, प्रक्षोभक आणि बदनामीकारक वक्तव्य केल्याचा दावा करत सर्वोच्च न्यायालयातीला वकील आणि सामाजिक कार्यकर्ते विनीत जिंदाल यांनी दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 120B, 153A, 295, आणि 504 आणि IT कायद्याच्या कलमांन्मवये त्यांनी ही तक्रार दाखल केली आहे.
उदयनिधी स्टॅलिन म्हणाले की, सनातन हे संस्कृत नाव आहे. तर सनातन धर्म हा सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे. काही गोष्टींना विरोध करता येत नाही, त्या संपवल्या पाहिजेत. आम्ही डेंग्यू, डास, मलेरिया किंवा कोरोनाला विरोध करू शकत नाही. ते नष्टच करुन टाकायचा आहे. तसेच सनातनलाही नष्ट करायचे आहे.