नव वर्षात मोठं संकटं घोंगावतंय?; घरात पुरेसं अन्न अन् रोकड ठेवा; ओपन लेटरनं खळबळं

2027 Could Be Worst Than Covid AI मुळे 2027 मध्ये कोविडपेक्षाही मोठं संकट येणार? तज्ज्ञाचं ओपन लेटर व्हायरल...

Nikola Jurkovic Viral Open Letter On AI

Nikola Jurkovic Viral Open Letter On AI

2027 Could Be Worst Than Covid Stock Up Food And Cash : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर सध्या एक पत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हे पत्र वाचून अनेकांना धक्का बसला आहे. विशेष म्हणजे, हे पत्र कोणत्याही सामान्य व्यक्तीचं किंवा अफवा पसरवणाऱ्या व्यक्तीचं नसून, निकोला जुरकोविच (Nikola Jurkovic) यांचं आहे. निकोला हे ‘METR’ नावाच्या नॉन-प्रॉफिट संस्थेत टेक्निकल स्टाफ म्हणून कार्यरत असून,  या संस्थेचं कामच प्रगत AI सिस्टम्सचे संभाव्य धोके तपासणं आहे.

एकीकडे संपूर्ण जग थँक्सगिव्हिंगच्या सुट्ट्यांमध्ये कुटुंबीयांसोबत आनंद साजरा करत असताना, निकोला यांनी आपल्या कुटुंबीयांना उद्देशून एक खुलं पत्र लिहिलं आणि त्यातून अत्यंत गंभीर इशारा दिला. त्यांनी या पत्रात स्पष्टपणे म्हटलं आहे की, यंदाचा थँक्सगिव्हिंग हा त्यांच्या आयुष्यातील पहिलाच असा प्रसंग आहे, जेव्हा पुढील वर्षीचा थँक्सगिव्हिंग साजरा करण्यासाठी आपण जिवंत असू की नाही, याचीही त्यांना खात्री वाटत नाही. घरात किमान दोन आठवड्यांचं अन्न, पाणी आणि काही प्रमाणात रोख रक्कम ठेवण्याचा सल्ला दिला आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण? आणि 2027 मध्ये नेमकं जगावर कोणतं संकट घोंगावतयं ते जाणून घेऊया…

थँक्सगिविंगच्या निमित्ताने कुटुंबाला उद्देशून लिहिलेल्या पत्रात निकोलो यांनी म्हटलं आहे की, AI च्या वेगवान प्रगतीमुळे परिस्थिती हाताबाहेर जात आहे आणि 2027 पर्यंत मोठा धोका निर्माण होऊ शकतो. एवढचं नव्हे तर, निकोला यांनी पुढील थँक्सगिव्हिंगपर्यंत आपण सुरक्षित असू की नाही, अशी भीतीही व्यक्त केली आहे.

निकोला यांच्या मते, AI मुळे जगासमोर प्रामुख्याने तीन प्रकारचे धोके निर्माण होऊ शकतात. यात पहिला धोका म्हणजे प्रगत AI सिस्टिम्स मानवी नियंत्रणाबाहेर जाण्याचा. अशा सिस्टिम्सनी वीज, पाणीपुरवठा किंवा बँकिंगसारख्या महत्त्वाच्या सेवांवर सायबर हल्ले केले, तर मोठ्या प्रमाणावर गोंधळ निर्माण होऊ शकतो. दुसरा धोका म्हणजे गुन्हेगार किंवा चुकीच्या विचारांच्या व्यक्ती AI चा वापर करून जैविक शस्त्रं तयार करण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे मानवी सुरक्षेला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. तर, तिसरा धोका म्हणजे जागतिक नेते आणि निर्णय घेणाऱ्या यंत्रणांनी AI सिस्टिम्सना गरजेपेक्षा जास्त अधिकार देणं. अशा परिस्थितीत महत्त्वाचे निर्णय घेण्याची प्रक्रिया मानवी नियंत्रणातून बाहेर जाण्याची भीती निकोला यांनी व्यक्त केली आहे.

निकोला यांनी पत्रात आणखी एक गंभीर शक्यता मांडली आहे. त्यांच्या मते, AI सिस्टिम्स स्वतःमध्ये सुधारणा करण्याच्या क्षमतेपर्यंत पोहोचल्या, तर 2027 च्या सुरुवातीपर्यंत त्या जगातील सर्वात बुद्धिमान माणसांनाही मागे टाकू शकतात. अशा परिस्थितीत AI स्वतःची उद्दिष्टं ठरवू लागलं आणि ती उद्दिष्टं मानवी हिताच्या विरोधात गेली, तर परिस्थिती हाताळणं कठीण होऊ शकतं, अशी भीतीदेखील त्यांनी व्यक्त केली आहे. इतकंच नाही, तर 2030 च्या अखेरपर्यंत मानवी अस्तित्वाला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता 50 टक्के असल्याचं म्हटलं आहे.

निकोला यांनी केवळ मानवी सुरक्षेचाच मुद्दा उपस्थित केलेला नाही, तर जागतिक अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या संभाव्य परिणामांकडेही लक्ष वेधलं आहे. पुढील 10 वर्षांत आज अस्तित्वात असलेल्या अनेक नोकऱ्यांचं स्वरूप बदलू शकतं किंवा काही नोकऱ्या पूर्णपणे संपुष्टात येऊ शकतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी निर्माण होण्याची शक्यता आहे. पुढील एक ते पाच वर्षांत शिक्षण, करिअर आणि कुटुंब नियोजनासारख्या सामान्य आयुष्याशी संबंधित गोष्टींवरही AI च्या वाढत्या प्रभावाचा परिणाम होऊ शकतो, असं मतं निकोला यांनी पत्रात नमुद केलं आहे.

या संभाव्य धोक्यांच्या पार्श्वभूमीवर निकोला यांनी त्यांच्या कुटुंबीयांना काही व्यावहारिक सूचना दिल्या आहेत. त्यांच्या मते, 2027 हे वर्ष कोविड महामारीपेक्षाही अधिक अस्थिर ठरू शकतं. त्यामुळे कुटुंबीयांनी संभाव्य आपत्कालीन परिस्थितीसाठी आधीपासून तयारी ठेवावी.ज्यात घरात किमान दोन आठवड्यांचा अन्नसाठा आणि पिण्याचं पाणी ठेवावं. काही प्रमाणात रोख रक्कम जवळ ठेवावी. तसेच मोठ्या प्रमाणावर सायबर हल्ले झाल्यास ऑनलाइन बँकिंग आणि डिजिटल पेमेंट सेवा विस्कळीत होऊ शकतात, याची तयारी ठेवावी.

आता AI च्या संभाव्य धोक्यांबाबत चिंता व्यक्त करणारे निकोला हे एकमेव तज्ज्ञ आहेत का तर, नाही. AI क्षेत्रातील प्रसिद्ध संशोधक योशुआ बेंजिओ यांनीही मानवी अस्तित्वासमोर निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्यांबाबत इशारा दिला आहे. तर, ‘गॉडफादर ऑफ AI’ म्हणून ओळखले जाणारे जेफ्री हिंटन यांनीही सुपरइंटेलिजन्सवर नियंत्रण मिळवण्याआधी त्याचा विकास करणं धोकादायक ठरू शकतं, असं मत व्यक्त केलं आहे. शिवाय Anthropic चे CEO डारियो अमोदेई यांनीही पुढील एक ते पाच वर्षांत AI मुळे सुरुवातीच्या स्तरावरील अनेक व्हाइट कॉलर नोकऱ्यांवर परिणाम होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली आहे.

निकोला यांचं व्हायरल होणारे पत्र वाचल्यानंतर अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. पण, निकोला यांनी केवळ धोक्यांचा इशारा दिलेला नाही, तर त्यावर उपायही सुचवले आहेत. त्यानुसार AI च्या विकासावर नियंत्रण ठेवण्यासाठी जगभरात कठोर नियम तयार करण्याची गरज असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. यासाठी युरोपियन युनियनच्या AI कायद्याचं उदाहरण देत निकोला यांनी सांगितलं की, AI तंत्रज्ञानासाठी सुरक्षेचे कडक निकष निश्चित केले, तर मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांनाही त्यांचं पालन करावं लागू शकतं. याशिवाय, AI च्या संभाव्य धोक्यांबाबत सामान्य नागरिकांनी जागरूक राहावं, सरकारकडे कठोर नियमांची मागणी करावी आणि संशोधकांनी AI सेफ्टी क्षेत्रात काम करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केलं आहे.

AI तंत्रज्ञानामुळे जगासमोर नव्या संधी निर्माण होत असताना त्याच तंत्रज्ञानाच्या संभाव्य धोक्यांकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. 2027 मध्ये कोविडपेक्षाही मोठं संकट येणार, हा दावा सध्या निश्चित मानता येत नसला, तरी AI च्या वाढत्या क्षमतेवर नियंत्रण, सायबर सुरक्षा आणि मानवी सुरक्षिततेबाबत गंभीर चर्चा होणं गरजेचं आहे. तंत्रज्ञानाचा वेग वाढवण्याच्या स्पर्धेत मानवी सुरक्षाच मागे पडता कामा नये. कारण AI कितीही प्रगत झालं, तरी त्याचा वापर मानवाच्या हितासाठीच होणं हीच खरी कसोटी असणार आहे.

Exit mobile version