CNN, BBC, Fox News, HSBCसह 178 वेबसाइटवर सायबर हल्ला; आयफोन यूजर्सही हॅकर्सच्या निशाण्यावर

CNN, BBC, Fox News, HSBCसह 178 वेबसाइटवर सायबर हल्ला झाला आहे. आयफोन आणि आयपॅड युजर्सनाही हॅकर्सनी लक्ष्य केले असून, जाणून घ्या.

  • Ashok Parude
  • Written By: Published:
Cyber Attack

Cyber Attack : जगभरातील प्रसिद्ध 178 वेबसाइट्सवर मोठ्या प्रमाणात सायबर हल्ला झालाय. यात प्रसिद्ध वृत्तसंस्था CNN, BBC, Fox News, Zoom, HSBC बँक IKEA आणि Salesforce यांसारख्या नामांकित कंपन्यांच्या वेबसाइट्सना या हल्ल्याचा मोठा फटका बसला आहे. विशेष म्हणजे, या सायबर हल्ल्यात आयफोन आणि आयपॅड वापरणाऱ्यांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. हॅकर्सनी वेबसाइट्समध्ये घातक JavaScript कोड टाकून वापरकर्त्यांची गोपनीय माहिती चोरण्याचा प्रयत्न केला आहे. मंगळवारी हा प्रकार उघडकीस आला आहे. नेमकी कसा झाला हा हल्ला जाणून घ्या

सायबर हल्लेखोरांनी Optimizely Web या वेबसाइट एक्सपेरिमेंटेशन प्लॅटफॉर्मचा गैरवापर केला. Report URI या सायबर सुरक्षा संशोधन संस्थेने या हल्ल्याचा शोध लावला. हल्लेखोरांनी Optimizely वरील ग्राहकांच्या अकाउंटमध्ये अनधिकृत बदल करून घातक JavaScript कोड टाकला. त्यामुळे संबंधित वेबसाइट्सना विश्वासार्ह स्रोत वाटणाऱ्या Optimizely च्या सर्व्हरमार्फत हा मालवेअर वापरकर्त्यांपर्यंत पोहोचला होता.

नेमका कसा झाला 178 वेबसाइट्सवर सायबर हल्ला?
सामान्यतः एखाद्या वेबसाइटवर हल्ला करण्यासाठी हॅकर्स थेट त्या वेबसाइटच्या सर्व्हरमध्ये घुसखोरी करतात. मात्र, या प्रकरणात हल्लेखोरांनी वेगळीच पद्धत वापरली. त्यांनी Optimizely Web या प्लॅटफॉर्मवरील ग्राहकांच्या प्रोजेक्ट JavaScript (projectJS) विभागात घातक कोड टाकला. Optimizely या प्लॅटफॉर्मचा वापर वेबसाइटवर विविध प्रयोग आणि बदल करण्यासाठी JavaScript कोडच्या माध्यमातून केला जातो. हॅकर्सनी याच सुविधेचा गैरवापर केला. त्यामुळे cdn.optimizely.com या विश्वासार्ह कंटेंट डिलिव्हरी नेटवर्कद्वारे मालवेअर संबंधित वेबसाइट्सवर पोहोचला. Report URI चे संस्थापक स्कॉट हेल्मे यांनी या प्रकाराबाबत चिंता व्यक्त केली आहे. हल्लेखोरांनी Optimizely ची पायाभूत सुविधा आणि सुरक्षा प्रमाणपत्रांचा वापर केल्याचे संशोधकांनी सांगितले. मात्र, विविध ग्राहकांच्या अकाउंटमध्ये हॅकर्सनी नेमकी घुसखोरी कशी केली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.


मालवेअरद्वारे कोणती माहिती चोरण्यात आली?

या सायबर हल्ल्यातील मालवेअर केवळ सामान्य माहिती चोरण्यापुरता मर्यादित नव्हता. वापरकर्त्यांच्या आर्थिक व्यवहारांपासून ते वैयक्तिक ब्राउझिंग डेटापर्यंत विविध प्रकारची माहिती चोरण्याची क्षमता त्यात होती.

क्रिप्टोकरन्सी चोरी : वापरकर्त्यांच्या क्रिप्टो वॉलेटमधील व्यवहारांसाठी वापरले जाणारे पत्ते बदलून हॅकर्सच्या नियंत्रणातील वॉलेट पत्ते टाकले

बँक कार्डची माहिती : ऑनलाइन पेमेंट करताना वापरल्या जाणाऱ्या क्रेडिट आणि डेबिट कार्डची माहिती चोरणे.

ब्राउझर कुकीजची चोरी : वापरकर्त्यांच्या ब्राउझरमधील संवेदनशील माहिती असलेल्या कुकीज मिळवणे.

स्क्रीनशॉट घेणे : वापरकर्त्यांच्या डिव्हाइसच्या स्क्रीनचे स्क्रीनशॉट घेणे.

आयफोन-आयपॅडला लक्ष्य : Coruna आणि DarkSword या दोन iOS Exploit Kits च्या माध्यमातून असुरक्षित आयफोन आणि आयपॅडमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. Report URI च्या माहितीनुसार, हल्लेखोरांच्या क्रिप्टोकरन्सी वॉलेटमध्ये पैसे जमा झाल्याचेही आढळले आहे. 16 नोव्हेंबर रोजी रात्री 7.25 वाजेपर्यंत (UTC) या वॉलेटमध्ये सुमारे 7,040 डॉलर जमा झाले होते.

CNN, BBC, Fox News आणि HSBC सह अनेक कंपन्यांना फटका
या सायबर हल्ल्याच्या यादीत मीडिया, बँकिंग, तंत्रज्ञान, रिटेल, आरोग्य आणि टेलिकॉम क्षेत्रातील अनेक कंपन्यांचा समावेश आहे. CNN, BBC, Fox News, Salesforce, Zoom, GitLab, HSBC, Equifax, IKEA, ASOS, Ledger, Air France-KLM, Vodafone, Starbucks आणि Peacock या कंपन्यांची नावे समोर आली आहेत. याशिवाय ABN AMRO, Paychex, Funding Circle, Bitly, Hootsuite, Mixpanel आणि Tableau यांचाही या यादीत समावेश आहे. परंतु हॅकर्सनी घुसखोरी करून सर्वच ग्राहकांची माहिती चोरली नाही, असे सांगितले जात आहे.

कंपन्यांकडून तपास सुरू; घातक कोड हटवण्याची प्रक्रिया
या घटनेनंतर अनेक कंपन्यांनी तपास सुरू केला आहे. Salesforce ने Optimizely स्क्रिप्टमध्ये अनधिकृत बदल झाल्याचे सांगत खबरदारी म्हणून त्या स्क्रिप्ट तात्पुरत्या बंद केल्या आहेत. Equifax नेही या प्रकरणाची चौकशी करून Optimizely चा वापर थांबवला. कंपनीने आपल्या अंतर्गत प्रणालीमध्ये घुसखोरी झाल्याचा कोणताही पुरावा नसल्याचे स्पष्ट केले.


आयफोन आणि आयपॅड वापरकर्त्यांनी काय काळजी घ्यावी?

या सायबर हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर Apple डिव्हाइस वापरणाऱ्यांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

iOS अपडेट करा : आयफोन आणि आयपॅडमध्ये उपलब्ध असलेले नवीन सुरक्षा अपडेट इन्स्टॉल करा. Report URI ने iOS 18.7.3 किंवा त्यापुढील तसेच iOS 26.3 किंवा त्यापुढील आवृत्ती वापरण्याचा सल्ला दिला आहे.

क्रिप्टो व्यवहार तपासा : क्रिप्टोकरन्सी वॉलेटमधील व्यवहार आणि पैसे पाठवण्यापूर्वी प्राप्तकर्त्याचा वॉलेट पत्ता काळजीपूर्वक तपासा.

बँक स्टेटमेंट तपासा : क्रेडिट आणि डेबिट कार्डवरून झालेल्या व्यवहारांमध्ये अनोळखी किंवा संशयास्पद व्यवहार आहेत का, याची खात्री करा.

ऑनलाइन पेमेंट करताना सावध राहा : संशयास्पद वेबसाइटवर कार्डची माहिती किंवा वैयक्तिक तपशील देणे टाळा.

या घटनेमुळे सॉफ्टवेअर सप्लाय चेन अटॅकचा धोका पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. एखाद्या थर्ड पार्टीच्या सॉफ्टवेअरमध्ये घुसखोरी करून हॅकर्स शेकडो विश्वासार्ह वेबसाइट्सच्या माध्यमातून लाखो वापरकर्त्यांना लक्ष्य करू शकतात, हे या हल्ल्यातून स्पष्ट झाले आहे.

follow us